केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयातील एकाला मारहाण प्रकरणात अटक करून मोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेला पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याला सांगलीतील जिल्हा कारागृहात आणण्यात आल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. मात्र एवढ्या मोठ्या गुंडाला सांगलीच्या कारागृहात हलवण्याबाबतचे कारण समजू शकलेले नाही.
कोथरूड परिसरात मारणे टोळीतील गुंडांनी आयटी अभियंत्याला बेदम मारहाण केली होती. भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा निकटवर्तीय असलेल्या तरुणाला झालेल्या या मारहाणीनंतर पुणे पोलिस अॅक्शन मोडमध्ये आले होते. गजानन मारणे आणि टोळीवर पोलिसांकडून मकोका लावण्यात आला. त्यानंतर गजा मारणेला आज ३ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. मारणे याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
कोथरुड परिसरात १९ फेब्रुवारी रोजी देवेंद्र जोग या तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी गजानन मारणे याला टोळी प्रमुख म्हणून पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान फिर्यादी देवेंद्र जोग यांनी स्वतः कोर्टात हजर राहून कोणीही चिथावनी दिली नसल्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. गजा मारणेला पोलिसांनी मोक्काच्या गुन्ह्यात सोमवारी रात्री उशिरा अटक केली होती आणि त्यानंतर कोणत्याही प्रकारची बडदास्त न ठेवता थेट मांडी घालून त्याला जमिनीवर बसवले होते. तसंच ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू (३५), किरण कोंडिबा पडवळ (३१), अमोल विनायक तापकीर (३५, तिघेही रा. शास्त्रीनगर, कोथरूड) यांना अटक केली होती. आरोपींपैकी श्रीकांत ऊर्फ बाब्या संभाजी पवार हा गजा मारणे याचा भाचा आहे. तर रुपेश मारणे आणि गजा मारणे या दोघांनादेखील पोलिसांनी या गुन्ह्यात आरोपी केले आहे.गजा मारणे याच्यावर आतापर्यंत डेक्कन, कोथरूड, सासवड, दत्तवाडी, पौड, कामोठा, शिरगाव, हिंजवडी, भारती विद्यापीठ पोलिस ठाणे अशा वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात २८ गुन्हे दाखल आहेत. पुढे एकेकाळचा मित्र असलेला नीलेश घायवळ याच्याशी गजा मारणेचे शत्रुत्व निर्माण झाले. बाबा बोडके याच्याशी देखील त्याचे शत्रुत्व निर्माण झाले. त्यातून या टोळ्यांमध्ये टोळीयुद्ध भडकले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.