Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'मल्हार सर्टिफिकेट' वादात! नितेश राणेंना जेजुरीच्या विश्वस्तांचं पत्र; 'खंडोबा पूर्णपणे...'

'मल्हार सर्टिफिकेट' वादात! नितेश राणेंना जेजुरीच्या विश्वस्तांचं पत्र; 'खंडोबा पूर्णपणे...'
 

महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेंनी मांसविक्रीसंदर्भात केलेल्या एका मोठ्या घोषणेमुळे नवीन वादाला तोंड फुटलेले असतानाच आता या घोषणेवरुन अजून एक वाद निर्माण झाला आहे.

नितेश राणेंनी केलेल्या घोषणेमुळे महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या खंडोबाच्या भक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. मांसविक्रीसंदर्भात सरकारकडून दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्राला 'मल्हार' असं नाव देण्यात आल्याने खंडोबाचे भक्त नाराज झाले आहेत. जेजुरीमधील श्री मार्तंड देवस्थानचे विश्वस्त डॉक्टर राजेंद्र खेडेकर यांनी नितेश राणेंना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये खेडेकरांनी आपली बाजू मांडली असून सध्या दिलेलं नाव कसं अयोग्य आहे याबद्दलचं मतप्रदर्शन केलं आहे.

निर्णयाला पाठींबा पण...

खेडेकरांनी सदर निर्णयाला पाठींबा असला तरी नावाला विरोध असल्याचं आपल्या पत्रामधून अधोरेखित केलं आहे. "आपण आज घेतेला निर्णय अत्यंत सार्थ आहे. जेणेकरुन उत्तर प्रदेश सारखाच आपण कोणाकडून मांस विक्री, खरेदी करतोय हे समजायला मदत होईल. तसेच गोमांस किंवा कुत्रे मांस विक्रीला आळा बसेल. मात्र हे करताना एक मल्हार भक्त म्हणून महत्त्वाची सूचना करावी असे वाटते. या योजनेचं नाव आपण त्वरित बदलावं, अशी आम्ही आधी आपल्याला विनंती आहे," असं पत्राच्या सुरुवातीलाच खेडेकर यांनी स्पष्ट केलं आहे.

खंडोबा पूर्णपणे शाकाहारी देवता
योजनेचं नाव बदलण्याची मागणी करण्यासंदर्भातील कारणाचा खेडेकर यांनी पत्रात पुढे खुलासा केला आहे. "श्री मल्हार म्हणजे खंडोबा, अवघ्या महाराष्ट्राचे दैवत. ही देवता पूर्णपणे शाकाहारी आहे. देवाला फक्त पुरणपोळी किंवा चंपाषष्ठीच्या काळात वांग्याचे भरीत रोडगा नैवेद्य असतो. इतकेच नव्हे तर खंडोबा ही देवता मुक्या जणांवर नितांत प्रेम करणारी देवता आहे. म्हणून देवाच्या बाजूला नेहमी घोडा, कुत्रे, बैल आदी प्राण्यांचा सहवास असतो," असं खेडेकरांनी पत्रात म्हटलं आहे.
आपल्याला कळकळीची विनंती आहे की...

"मुळातच या योजनांना कोणत्याही हिंदू देवतांचे नाव देणे हे चुकीचं आहे. मी जरी श्री मार्तंड देव संस्थानचा विश्वस्त असलो तरी विश्वस्त मंडळाची भूमिका याविषयी काय आहे मला माहित नाही. मात्र माझी भूमिका फक्त नाव बदलण्यात यावं एवढीच आहे. त्यामुळे माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की या योजनेचे नाव मल्हार सोडून दुसरे कोणतेही ठेवावं," असं पत्राच्या शेवटी खेडेकरांनी आपली मागणी मांडताना म्हटलं आहे.

नितेश राणे नेमकं काय म्हणालेले?
नितेश राणे यांनी झटका मटण दुकानांना 'मल्हार प्रमाणपत्र' देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळं राज्यात पुन्हा एकदा वाद उफाळून आला आहे. नितेश राणे यांनी मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम लाँच केले आहे. झटका मटण विक्री करणाऱ्या दुकानदारांना हे मल्हार प्रमाणपत्र मिळणार आहे. "आम्ही महाराष्ट्रातल्या हिंदू समाजासाठी अतिशय महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम या निमित्ताने सुरू झालेलं आहे. मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटण दुकानं उपलब्ध होतील व 100 टक्के हिंदू समाजाचा प्राबल्य असेल व विकणारा व्यक्ती देखील हिंदू असेल. कुठेही मटणामध्ये भेसळ झालेले आढळणार नाही,' असं नितेश राणेंनी 'मल्हार प्रमाणपत्रा'बद्दल माहिती सांगताना म्हटलं. मात्र आता या हल्ला आणि झटका मटण वादात पूर्णपणे शाकाहारी असलेल्या खंडोबाचं नाव कशाला असा सवाल भक्तांकडून उपस्थित केला जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.