Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गोडाऊनच्या नावावर कोल्हापुरात बेकायदेशीर स्फोटकांचा साठा

गोडाऊनच्या नावावर कोल्हापुरात बेकायदेशीर स्फोटकांचा साठा
 

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक आणि कोकणाचा केंद्रबिंदू असलेले कोल्हापूर शहर. साहजिकच कोल्हापुरातून मोठ्या प्रमाणात माल इतरत्र जातो. त्यासाठी व्यापारी, व्यावसायिकांनी शहरात मोठमोठे गोडाऊन उभारले आहेत. यात ज्वलनशील साहित्याचाही समावेश आहे. अनेक गोडाऊन बेकायदेशीर असून नागरी वस्तीत आहेत. परिणामी शहराची सुरक्षा धोक्यात आली आहे. पोलिस आणि महापालिकेने संयुक्तरीत्या कारवाई करून ज्वलनशील साहित्याच्या गोडाऊनला कुलूप ठोकण्याची गरज आहे.

कोल्हापूर शहरात मध्यवस्तीत असलेल्या सोमवार पेठेतील घिसाड गल्लीत फटाक्यांच्या गोडाऊनला आग लागली. यात त्या गोडाऊनसह आजाबाजूची पाच घरे आगीमध्ये भस्मसात झाली. रात्रीची वेळ असूनही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र त्याठिकाणी आगीच्या रौद्ररूपात भस्म झालेली घरे आणि गोडाऊन पाहिलेल्यांना त्याची तीव-ता पाहून अंगावर काटा येत होता. जवळच एक शाळा आहे. दुर्दैवाने दिवसा ही दुर्घटना घडली असती तर... नुसता विचारही डोके सुन्न करून जातो. त्यामुळे शहरातील अशी गोडाऊन आता बाहेर घालविलीच पाहिजेत.

शहरातील बाजारपेठांत अनेक व्यावसायिकांची दुकाने आहेत. त्याबरोबरच बाजूला किंवा नागरी वस्तीत संबंधित व्यापार्‍यांनी गोडाऊन तयार केली आहेत. या गोडावूनमध्ये ज्वलनशील साहित्य ठेवण्यात येत आहे. यात फटाक्यांसह प्लास्टिकचे साहित्य आणि इतर ज्वलनशील साहित्यांचा समावेश आहे. शहरातील गजबजलेल्या पेठांतही हीच स्थिती आहे. या गोडावूनवर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे वास्तव आहे. कुणीही गोडावून करावे आणि ज्वालाग्राही साहित्य ठेवावे, नागरिकांचा जीव धोक्यात घालावा अशी परिस्थिती आहे. महापालिकेच्या परवानगीशिवाय अशी गोडावून तयार करण्यात आली आहेत. महापालिकेच्या परवाना विभाग, अग्निशमन दलाला त्याची माहिती असणे आवश्यक आहे. त्याबरोबरच ज्वलनशील साहित्याच्या गोडाऊनला परवानगी देताना पोलिसांचा ना हरकत दाखला घेणेही बंधनकारक करण्याची गरज आहे.

कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली नसल्याने अस्तित्वात असलेल्या जागेवरच बहुमजली इमारती उभ्या राहात आहेत. अरुंद रस्ते आणि गल्लीबोळांनी शहर व्यापले आहे. कोल्हापूर शहरात तब्बल 70 पेक्षा जास्त झोपडपट्ट्या आहेत. अनेक ठिकाणी जुन्या वस्ती असून भिंतीला भिंती लागून घरे आहेत. गावठाण भागात तर भयानक स्थिती आहे. अग्निशमन दलाचे वाहन जाणे तर लांबच, एखादी लहान अ‍ॅम्ब्युलन्सही जाऊ शकत नाही हे वास्तव आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास सरकारी यंत्रणेची मोठी तारांबळ उडते. साधारण एप्रिल-मेच्या कालावधीत उन्हाचा तडाखा जास्त असतो. आता तर उन्हाने सर्व आकडेवारी आणि तज्ज्ञांची मते साफ फोल ठरवत पारा चढाच ठेवला आहे. त्यामुळे प्रचंड उष्मा वाढला आहे. परिणामी मोठमोठ्या गोडावूनमध्ये पत्रा गरम होऊन किंवा शॉर्टसर्किटने आगी लागत आहेत. क्षमतेपेक्षा जास्त साहित्य ठेवल्याने अशा घटनांत वाढच होत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.