Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मलईदार जागेसाठी खोके देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार, टेंडर पोस्टिंग रडारवर

मलईदार जागेसाठी खोके देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार, टेंडर पोस्टिंग रडारवर
 

गेल्या वर्ष-दीड वर्षात बदल्या आणि मलईदार पोस्टिंगसाठी भरगच्च टेंडर भरणारे पोलीस अधिकारी आता सरकारच्या रडारवर आले आहेत. बदलीवर मुंबईत आल्यानंतर वरिष्ठांना लक्ष्मी दर्शन घडवून बऱ्याच अधिकाऱ्यांनी पाहिजे त्या जागेवर पोस्टिंग मिळविल्या. त्यानंतर वसुली या एककलमी कामाला ते अधिकारी लागले आहेत, पण टार्गेट अद्याप पूर्ण व्हायचे बाकी असताना त्यांच्या बदलीचे आदेश निघणार असल्याने संबंधितांचे धाबे दणाणले असल्याचे वरिष्ठ अधिकारी सांगतात.

 
अलीकडेच पार पडलेल्या निवडणुकांआधी राज्यातील पोलीस उपनिरीक्षकांपासून उपायुक्तांपर्यंत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आपल्या मर्जीतल्या ठाणे, नवी मुंबईतील बऱ्याच वसुलीबाज अधिकाऱ्यांना मुंबईत आणले होते. मुंबईत आल्यानंतर वरिष्ठांकडे टेंडर भरून त्या खास अधिकाऱ्यांनी मलाईदार पोस्टिंग मिळवल्या होत्या. हवी ती जागा मिळविल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी जोरदार वसुलीला सुरुवात केली. साहेबांच्या आशीर्वादाने आलो असल्याने आपली कोणी काही वाकडे करू शकणार नाही अशा आविर्भात ते अधिकारी असून वरिष्ठांनाही जुमानत नाहीत, पण आता चित्र लवकरच बदलणार आहे. आजी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी या टेंडरबाज पोलीस अधिकाऱ्यांची गंभीर दखल घेतली आहे. खोके देऊन बसलेल्या अधिकाऱ्यांना लवकरच दणका देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.
मुंबई पोलीस दलात उपनिरीक्षकापासून उपायुक्तपर्यंतच्या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीमध्ये दक्षिणा घेतल्याशिवाय काहीच होत नाही. मलाईदार पोस्टिंगसाठी कोट्यवधी रुपये मोजावे लागत आहेत. भस्म्या झालेला एक वरिष्ठ अधिकारी टेबलाखालून खोके घेतल्याशिवाय फाईलीवर शेराच उमटवत नाही, अशी पोलीस दलात जोरदार चर्चा सुरू आहे. ते वरिष्ठ पोलीस अधिकारी भ्रष्टाचाराचा महामेरू असल्याचे कनिष्ठ अधिकारी व कर्मचारी दबक्या आवाजात बोलत आहेत. लवकर त्यांच्या तावडीतून आमची सुटका व्हावी अशी प्रार्थना अधिकारी, कर्मचारी करीत आहेत.

टेंडर बाजांच्या नाकाबंदीला सुरुवात; चार खोके देऊन एक अधिकारी
पोलीस आयुक्तालयात विराजमान झाला आहे. तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा तो खास मर्जीतला अधिकारी असून त्यांच्या आशीर्वादाने आतापर्यंत त्याला मलाईदार पोस्टिंगच मिळाल्या आहेत. मुंबईत येऊन एका महत्त्वाच्या विभागाचा चार्ज घेतल्यानंतर त्या अधिकाऱ्याने जोरदार वसुली सुरू केली होती, परंतु अद्याप त्यांचे चार कोटी वसूल न झाल्याने त्या अधिकाऱ्याचा भ्रमनिरास झाला आहे. बारवाल्यांनी त्याच्याकडे पाठ फिरविली आहे असे वरिष्ठ अधिकारी सांगतात. ज्यांचा डोक्यावर हात आहे त्यांचेच आता काही चालेनासे झाल्याने त्या अधिकाऱ्याची चांगलीच गोची झाली आहे. आयुक्तालयातील त्या अधिकाऱ्याच्या बॉसनेदेखील त्यांची नाकाबंदी केली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.