बीड येथील मस्सोजाग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला तीन महिने उलटून गेले आहेत. या हत्या प्रकरणाची सध्या न्यायलयीन, एसआयटी आणि सीआयडी चौकशी सुरु असून एक आरोपी वगळता सर्व आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी या प्रकरणात
दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. यातून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.
खंडणीसाठीच ही हत्या घडवण्यात आली हे स्पष्ट झाले असून हत्येवेळीचे फोटो
दोषारोपपत्रातून समोर आलेत. यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.
दरम्यान, आज बुधवारी (दि. 12) संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी केज
जिल्हा व सत्र न्यायालयात पहिली सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीला संतोष
देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख उपस्थित राहणार आहेत. तर पहिल्या
सुनावणीला ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम हे उपस्थित राहणार नाहीत. तर
वाल्मिक कराडने आपला वकील बदलला आहे. आजच्या सुनावणीत नेमकं काय होणार? हे
पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे चार्जशीट
कोर्टामध्ये दाखल झाल्यानंतर आज पहिली सुनावणी होणार आहे. या सुनावणीला
संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख हे स्वतः कोर्टामध्ये हजर राहणार
आहेत. न्याय प्रविष्ठ बाबी जाणून घेण्यासाठी न्यायालयात जाणे आवश्यक आहे.
त्यामुळे आम्ही न्यायालयात जात असल्याचे धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे. तर
आरोपींना कोर्टात व्हिसीद्वारे हजर केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
वाल्मिक कराडने वकील बदलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पहिल्या सुनावणीला उज्वल निकम उपस्थित राहणार नाहीत. आज सरकारी पक्षाकडून सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे हेच सरकार पक्षाकडून बाजू मांडणार आहेत. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये वाल्मिक कराडची बाजू अॅड खाडे हे मांडणार आहेत. आतापर्यंत अशोक कवडे हे वाल्मिक कराडचे वकील म्हणून काम पाहत होते. मात्र यापुढे कोल्हापूर येथील वकील खाडे हे वाल्मिक कराडचे काम पाहणार आहेत. अशोक कवडे ऐवजी खाडे हे वाल्मिक कराडचे वकील म्हणून आज कोर्टात हजर राहण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे?
आज अकरा वाजता सुनावणी अपेक्षित आहे. आरोपींना जेलमधून केज आणणार की नाही हा प्रश्न आहे. आरोपीच्या वतीने त्यांचे वकील आज हजर होतील. आरोपींच्या वकीलाकडून काही अर्ज केले जाण्याची शक्यता आहे. हत्या प्रकरण बीडमध्ये चालवण्यासाठी एसआयटीने अर्ज केला होता, त्यावर 18 मार्चला सुनावणी आहे. आरोपींच्या वकिलांनी वेळ मागवून घेतल्याने 18 तारखेला सुनावणी पार पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आरोपीचे वकील हे दोषारोपत्रात नसलेल्या माहितीची मागणी करणार
दरम्यान, आज पहिल्या सुनावणीच्या वेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीचे वकील हे दोषारोपत्रात नसलेल्या माहितीची मागणी करणार असल्याची माहिती मिळत आहे. साक्षीदाराचे जवाब आणि आरोपीचे जबाब यासोबतच आरोपीच्या ज्या फोन कॉलचा आरोप पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. त्या सगळ्या फोन कॉलचे सीडीआर आरोपीचे वकील मागणार असल्याची माहिती समोर येत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.