परळी वैजनाथ : गोरक्षण सेवा संघाच्या तीन गोरक्षकांनी परळी नगर परिषदेसमोर गेल्या सहा दिवसापासून आमरण उपोषण सुरू केले होते. परळीतील अवैध कत्तलखाना उद्ध्वस्त करा, यासह गो हत्या बंदी बाबतच्या सहा मागण्यासाठी हे उपोषण होते. आज या उपोषणाच्या समर्थनार्थ सकल हिंदू
समाज रस्त्यावर उतरला. त्यानंतर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी आश्वासन
देत तात्काळ हा कत्तलखाना सील करण्यात येईल असे सांगितले. यावर तातडीने
कारवाई करण्यात आली असुन अखेर बहुचर्चित परळीतील अवैध कत्तलखाना सील
करण्यात आला आहे.
परळी शहरात अवैध कत्तलखाना सुरू असुन तो कत्तलखाना उद्ध्वस्त करून टाका अशा प्रकारची मागणी गोरक्षण सेवा समितीने केली होती. परळी नगर परिषदेने परळी शहरात कोणत्याही कत्तलखान्याला अधिकृत परवानगी दिलेली नसल्याची बाब स्पष्ट केलेली होती. तरीही अवैधरीत्या हा कत्तलखाना सुरू असल्याचे दिसत असतानाही प्रशासन हा कत्तलखाना बंद करण्याबाबत कारवाई का करत नाही? असा सवाल गोरक्षकांनी केला होता. त्याचप्रमाणे गोहत्या बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी अशा प्रकारचीही या गोरक्षण समितीची मागणी होती. या मागण्या घेऊन गेल्या सहा दिवसापासून परळी नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते.
तीन गोरक्षकांनी हे आमरण उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या आजच्या सहाव्या दिवशी उपोषणकर्त्यांची प्रकृती अतिशय खालवल्याचेही दिसून आले. याच अनुषंगाने परळीतील व्यापारी व सर्व स्तरातील सकल हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. राणी लक्ष्मीबाई टावर चौकापासून ते नगरपरिषद कार्यालयापर्यंत हा मूक मोर्चा जाऊन धडकला. त्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली. पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनीही उपोषणार्थ्यांशी संवाद साधून आपले उपोषण मागे घेण्याबाबत मध्यस्थी केली. तसेच त्यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने तातडीने योग्य ती कारवाई करावी अशा प्रकारचे निर्देश प्रशासनाला दिले. त्यानंतर लेखी आश्वासनाचे पत्र परळी नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांना दिले. उपोषण स्थगित झाल्यानंतर या उपोषणकर्त्यांना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी मिळाल्यानंतर अवैध कत्तलखाना जमीनदोस्त होणार
या दरम्यान दिलेल्या आश्वासनाप्रमाणे नगरपरिषद मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे यांनी तातडीने पावले उचलत नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना अवैध चालू असलेला कत्तलखाना बंदिस्त करण्याची कारवाई केल्याचे दिसुन आले. परळी नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने हा अवैध कत्तलखाना पत्रे ठोकून आता सील करण्यात आला आहे. एकंदरीतच गोरक्षकांच्या सहा दिवसाच्या आंदोलनाला यामुळे काही प्रमाणात यश मिळाले असुन तूर्तास हा कत्तलखाना प्रशासनाने सील केला आहे. स्ट्रक्चरल ऑडिट साठी प्रस्ताव पाठवण्यात आला असुन या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी मिळाल्यानंतर हा अवैध कत्तलखाना जमीनदोस्त करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने सांगितले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.