Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंट्सकडून व्यवहार", भाजपा आमदाराचा सरकारला घरचा आहेर

"विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंट्सकडून व्यवहार", भाजपा आमदाराचा सरकारला घरचा आहेर
 

विधानसभेच्या अधिवेशनात प्रश्न लावण्यासाठी, लक्षवेधी लावण्यासाठी नेत्यांच्या एंजट्सकडून व्यवहार होत असल्याचा आरोप भाजपा आमदार परिणय फुके यांनी केला आहे. बुधवारी (१२ मार्च) विधान परिषदेत बोलताना त्यांनी हा ‘एजंट बॉम्ब’ फोडून सरकारला घरचा आहेर दिला आहे. फुके यांनी यासंदर्भातील ऑडिओ क्लिपही सादर केली आहे. विधानसभेत प्रश्न का लावायचा नाही, प्रश्न लावल्यावर काय होईल यासंदर्भातील धमक्या या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहेत. फुकेंच्या या एजंट बॉम्बने मोठी खळबळ उडाली आहे.

परिणय फुके म्हणाले, “२०२३ मध्ये तत्कालीन मंत्र्याने यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. मी प्रामुख्याने तीन-चार राईस मिलसंदर्भात सांगतोय. या कारखान्यांना घोटाळ्यांच्या आरोपांमध्ये क्लीन चिट देण्यात आली आहे. काल विधानसभेमधील प्रश्नोत्तराच्या तासांत यासंदर्भातील प्रश्न उपस्थित करण्यात आला. हा प्रश्न मांडण्याच्या दोन दिवस आधीची ऑडिओ क्लिप माझ्याकडे आहे.”

भाजपा आमदार म्हणाले, “काही एजंट्स राईस मिलच्या कार्यालयात गेले होते. तिथे यासंदर्भातील प्रश्न विधानसभेत लावायचा नाही, प्रश्न लावल्यावर काय होईल, अशा धमक्या देण्यात आल्या. त्याची व्हिडीओ क्लिपदेखील माझ्याकडे आहे. यासंदर्भात मी राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सूचना दिली आहे.
एजंट्सवर कठोर कारवाई होईल : योगेश कदम

दरम्यान, राज्याचे गृहराज्यमंत्री (शहर) योगेश कदम यांनी परिणय फुके यांच्या प्रश्नाला उत्तर दिलं. कदम म्हणाले, “कोणत्याही राजकीय पक्षाचे नेते व एजंट असा गैरप्रकार करत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणात कुठलीही हलगर्जी सहन करणार नाही. हे लोक कुठल्याही राजकीय पक्षाचे असले तरी त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.”

उपमुख्यमंत्री आमदारांशी चर्चा करणार
योगेश कदम म्हणाले, “कोणी ब्लॅकमेल करत असेल, व्यवस्थेचा गैरफायदा घेत असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल. या घटनेचं गांभीर्य पाहून उपमुख्यमंत्री यावर चर्चा करणार आहेत. दोन्ही सभागृहातील सदस्यांशी ते बोलतील. ज्यांच्याकडे याविषयीची माहिती असेल त्यांनी एकत्रितपणे आपापले मुद्दे उपमुख्यमंत्र्यांकडे मांडावेत. आम्ही या बैठकीला परिणय फुके यांना देखील बोलावू.”

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.