महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराविरोधात अभिनेत्रीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. रायगडमधील कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्याविरोधात अभिनेत्रीने तक्रार दाखल केली आहे. भूखंड लाटण्यासाठी गुंडगिरीचा वापर केल्याचा आरोप या अभिनेत्रीने केला आहे.
यासंदर्भात अभिनेत्री हेमांगी राव यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती
दिली. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री आणि सह अभिनेत्री म्हणून
भूमिका साकारणाऱ्या हेमांगी राव यांनी रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील
शिवसेनेचे आमदार आणि नवी मुंबई येथील एका व्यावसायिकाविरोधात खालापूर पोलिस
ठाण्यात तक्रार दाखल केली.
भूखंड लाटण्यासाठी धमकावल्याचा आरोप आमदारावर करण्यात आला आहे. त्यामुळे आमदार थोरवे यांच्या समोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. या प्रकरणाची चर्चा आता रायगडमध्ये होऊ लागली आहे. अभिनेत्री हेमांगी राव आणि त्यांचे
डॉक्टर पती विनोद राव यांची मुंबई- पुणे जुना महामार्गालगत खालापूर
तालुक्यातील कांडरोली गावाच्या हद्दीत जमिन आहे. नवीमुंबई येथील व्यावसायिक
विकासक दिपक वाधवा यांनी या जमिनीचा व्यवहार केला होता. मात्र काही
कारणास्तव हा व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही. मात्र तरी देखील वाधवा ही जमिन
बळजबरीने आणि दादागिरीचा वापर करत हस्तगत करत असल्याचा आरोप राव कुटुंबांने
केला आहे.
जमिन जबरदस्तीने बळकावण्यासाठी वाधवा यांना आमदार महेंद्र थोरवे हे मदत करत आम्हाला धमकावत असल्याचा आरोप अभिनेत्रीने पोलिसात दाखल केलेल्या तक्रार अर्जात केला आहे. पत्रकार परिषदेत या अभिनेत्रीने अनेक गंभीर आरोप देखील केले आहेत. ४ वेळा पोलिसांत तक्रार करुनही पोलिस याची दखल घेत नसल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणाली बाबतही अभिनेत्रीने प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. याप्रकरणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करण्यात आली असल्याचे देखील या अभिनेत्रीने सांगितले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.