गावात मित्रासोबत समलैंगिक संबंध, माऊलीला समजलं; शीर, हात, पाय कटरने कापून पोत्यात भरले!
अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी हद्दीत असलेल्या दाणेवाडी गावातील एका विहिरीत 12 मार्च रोजी एक अनोळखी मृतदेह आढळला होता. मृतदेहाचे शीर आणि पाय तोडून मृतदेह विहिरीत टाकून देण्यात आला होता. तर दुसरीकडे याच दाणेवाडी गावातील माजी सरपंच अनिल गव्हाणे यांचा 19 वर्षीय पुतण्या माऊली गव्हाणे हा देखील 6 मार्चपासून शिरूर येथून बेपत्ता झाला होता. 12 मार्चला दाणेवाडी गावातील विहिरीमध्ये छिन्न विछिन्न अवस्थेत आढळलेला मृतदेह माऊलीचाच असावा असा संशय व्यक्त होत असताना दाणेवाडीतील आणखी एका विहिरीत एक शीर आणि काही अवयव एका गोणीत फेकून दिल्याचे आढळून आले. दरम्यान या शीराच्या कानातील बाळीवरून हा मृतदेह हा माऊलीचाच असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे दाणेवाडी गावावर शोककळा पसरली. माऊलीची एवढ्या निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याने राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही असा सवाल ग्रामस्थांनी विचारला आहे.
गावात मित्रासोबत समलैंगिक संबंध, माऊलीला समजलं-
समलैगिंक संबधांतून ही हत्या झाल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे. संशयित आरोपी सागर दादाभाऊ गव्हाणे याचे गावातील एका मित्रासोबत समलैंगिक संबंध होते. ही बाब मयत माऊली गव्हाणेला समजली होती. याच कारणातून माऊलीची हत्या केल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे. माऊली आपल्या समलैंगिक संबंधांची गावात वाच्यता करेन, या भीतीपोटी आरोपींनी दीड महिन्यापूर्वी कट शिजवला.
शीर, हात, पाय कटरने कापून पोत्यात भरले!
पोलिसांनी या प्रकरणात सागर गव्हाणे याला अटक केली आहे. तर, दुसरा आरोपी हा अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. या दोघांनी संगनमताने माऊलीची हत्या केली. 6 मार्चच्या दिवशी माऊलीला रात्री 11.30 च्या सुमारास दोघा आरोपींनी बोलवून घेतले. आम्ही तुला रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास टॉर्चचा उजेड तुझ्या घराकडे दाखवू, त्यानंतर तो सिग्नल समजून तू आमच्याकडे ठरलेल्या ठिकाणी ये, त्यानुसार टॉर्चचा उजेड पाहून माऊली रात्री सुमारे साडेअकरा वाजता त्या समलैंगिक जोडप्याकडे गेला. त्यानंतर दोघांनी त्याचा गळा आवळून खून केला. नंतर इलेक्ट्रिक कटरच्या मदतीने त्याचे हात,पाय, धड आणि शीर वेगवेगळे केले आणि गावातील विहीरीत मृतदेहाचे अवयव पोत्यात भरुन फेकून दिले. दरम्यान,गुन्हेगारांनी अतिशय नियोजन करून हा गुन्हा केला होता. मात्र, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या योग्य तपासामुळे काही दिवसांतच आरोपींना ताब्यात घेऊन सत्य समोर आणण्यात पोलिसांना यश आले आहे. गुप्त माहितीदारांच्या मदतीने पोलिसांनी तपासाला गती मिळाली आणि या प्रकरणाचा तपास झाला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.