Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत करणी काढणाऱ्या भोंदू 'बाबाजी' अटक

सांगलीत करणी काढणाऱ्या  भोंदू 'बाबाजी' अटक
 
 
सांगली :- करणी काढण्यासाठी ९ हजार रुपये घेऊन मध्यरात्री होम पेटवून अघोरी पूजा करताना एका भोंदूला अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलीसांच्या सहकार्याने शनिवारी गजाआड केले. कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील बाबूजी लखनऊ या भोंदू बाबाच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा सांगलीचे कार्यकर्ते राहुल थोरात यांच्याकडे मागील आठवड्यात तक्रार आली होती. त्याप्रमाणे तक्रारदार बिराप्पा पांडेगावकर यांना नकली ग्राहक बनवून त्या बुवाकडे पाठवले. त्या बुवाने करणी उतरवण्यासाठी 9 हजार रुपये खर्च येईल आणि शनिवारीच्या रात्री बारा वाजता एक अघोरी पूजा करावी लागेल असे सांगितले. त्याप्रमाणे तो कसबे डिग्रज येथे अघोरी पूजा करण्यासाठी आला. काळी बाहुली, लिंबू, टाचणी, उद याचा वापर करून त्याने एक होम पेटवून अघोरी पूजा केली.

याबाबत सांगली ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. चौगुले यांना अंनिसचे कार्यकर्ते थोरात यांनी ही अघोरी पूजा होणार आहे याची माहिती दिली. चौगुले यांनी तातडीने याची दखल घेऊन पोलीस उपनिरीक्षक श्री. घाडगे यांना या अघोरी पूजेच्या ठिकाणी पाठवले. तेथे तो मांत्रिक अघोरी पूजा करताना रंगेहात सापडला. पोलिसांनी अघोरी पूजेचे सर्व साहित्य जप्त करून त्याला रात्री पोलीस स्टेशनला आणून सकाळी त्याच्यावर जादूटोणा विरोधी कायदे अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
 
करणी, भानामती, काळी जादू याची भीती घालून लोकांच्या मनामध्ये दहशत निर्माण करणे हा जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा आहे. जगात कोणाला करणी करता येत नाही किंवा उतरवता येत नाही. करणी ही कपोकल्पित गोष्ट आहे. त्याच्यावर जनतेने विश्वास ठेवू नये आणि भोंदूबुवांच्या थापांना बळी पडू नये, अशा भोंदू बाबांच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि जवळच्या पोलीस स्टेशन कडे तक्रार नोंदवावी असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते राहुल थोरात यांनी केले आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.