Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोल्हापूर :-जि.प. बनावट चेक प्रकरण : परप्रांतीय तरुणास उत्तर प्रदेशातून अटक

कोल्हापूर :-जि.प. बनावट चेक प्रकरण : परप्रांतीय तरुणास उत्तर प्रदेशातून अटक
 

कोल्हापूर : जिल्हा परिषदेत गाजत असलेल्या बनावट चेक प्रकरणाचे धागेदोरे थेट उत्तर प्रदेशपर्यंत पोहोचले आहेत. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी गाझियाबाद (उत्तर प्रदेश) येथून कपिल चौधरी (वय 29) याला अटक केली आहे. त्यामुळे 57 कोटी रुपयांच्या या बनावट चेक प्रकरणाचा लवकरच उलगडा होणार असून, या प्रकरणात कोण कोण गुंतले आहेत, याचा पर्दाफाशदेखील होणार आहे. संशयित आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला दि. 25 मार्चपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

जिल्हा परिषद खात्यावरील बनावट चेकद्वारे दि. 18 ते 21 फेब्रुवारी या कालावधीत 57 कोटी 4 लाख 40 हजार 786 रुपयांवर अज्ञातांनी डल्ला मारला होता. या रकमेपैकी 18 कोटी 4 लाख 30 हजार 641 रुपयांचा चेक पास होऊनही रक्कम आयडीएफसी फर्स्ट सानपाडा बँकेत जमा झाली होती. चेक न देता एवढी मोठी रक्कम खात्यातून गेल्याचे निदर्शनास येताच जिल्हा परिषद वित्त विभाग खडबडून जागा झाला. जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी कृष्णात पाटील यांनी याप्रकरणी तातडीने अज्ञाताविरोधात शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल केला.

शाहूपुरी पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी उपनिरीक्षक अभिजित पवार, कॉन्स्टेबल कृष्णात पाटील, उत्तम पाटील यांच्यासह तपास पथकाला चौकशीचे आदेश दिले. या पथकाने प्रथम मुंबईत ज्या बँकेत चेक भरले होते, त्या बँकेतील संबंधित खात्यांची माहिती मिळविली. तेथील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले. ज्या कंपनीच्या नावावर चेक भरला होता, ती कंपनी दिल्लीतील असल्याचे समजल्यानंतर हे पथक पाच दिवसांपूर्वी दिल्लीला रवाना झाले. तेथे संशयित आरोपीची माहिती मिळाल्यानंतर या पथकाने उत्तर प्रदेशमध्ये जात कपिल चौधरी याला अटक केली. त्याला मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती देशमुख यांनी 25 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलिस अधीक्षक धीरज कुमार, विभागीय पोलिस अधिकारी अजित टिके यांनी तपास पथकाला मार्गदर्शन केले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.