गारगोटी : गारगोटीत दोन वेगवेगळ्या दुर्घटनांत पाण्यात बुडून दोन युवकांचा मृत्यू झाला. राहुल किरण कलकुटकी (वय 32, रा. शिवाजीनगर, गारगोटी), तानाजी भागोजी बाजारी (18 रा. फये धनगरवाडा) अशी त्यांची नावे आहेत.
घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.
रंगपंचमी खेळून राहुल कलकुटकी दुपारी मित्रासमवेत वेदगंगा नदीवरील दत्त घाटावर आंघोळीसाठी गेला होता. यावेळी पाय घसरून तो पाण्यात पडला. पोहता येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. उपजिल्हा रुग्णालयात विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. याची वर्दी महेश कलकुटकी यांनी भुदरगड पोलिसांत दिली आहे. तानाजी बजारी येथील आयसीआरई पॉलिटेक्निकमध्ये विद्युत अभियांत्रिकी विभागात द्वितीय वर्षात शिकत होता व डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात राहत होता. दुपारी चारच्या सुमारास तो या परिसरातील विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेला होता. मित्राने मस्करी करत त्यास विहिरीत ढकलले; मात्र त्यास पोहता येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. योगेश कोळी यांनी दोन्ही मृतदेह बाहेर काढले.
तानाजी श्री मौनी विद्यापीठाच्या अमरनाथ कांबळे या वसतिगृहात दहावीपर्यंत राहिला होता. श्री शाहू कुमार भवन प्रशालेतून त्याने दहावीला 92 टक्के गुण मिळवले होते. येथील इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल अँड रूरल इंजिनिअरिंग (आयसीआरई) मध्ये विद्युत अभियांत्रिकी विभागात द्वितीय वर्षात शिकत होता. गेल्याच महिन्यात झालेल्या पॉलिटेक्निकच्या तिसर्या सेमिस्टरला त्याने 90 टक्के गुण मिळवले होते. त्याच्या मृत्यूची माहिती मिळताच वडिलांनी फोडलेला टाहो मन हेलावून टाकणारा होता. त्याच्या मागे आई, वडील आणि चार बहिणी असा परिवार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.