मुंबई: विधानसभा उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. विधानसभेचं उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेले आहे. आज दुपारी अर्ज पडताळणी करण्यात आली,
यामध्ये अण्णा बनसोडे यांचा अर्ज वैध ठरला आहे. उपाध्यक्षपदासाठी एकच अर्ज
आल्यामुळे त्यांची निवड निश्चित झाली आहे. विधान परिषदेचे उपसभापतीपद
शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे. तर आता विधानसभेचे उपाध्यक्षपद हे अजित
पवारांच्या राष्ट्रवादीकडे गेले आहे. सत्तेचे समान वाटप सध्या महायुतीमध्ये
होताना दिसत आहे. आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना डिवचत
म्हटले की तुम्ही कितीही आमचे पायात पाय अडकवण्याचा प्रयत्न करा, मात्र
आम्ही तिघे हातात हात घालून पुढे निघालो आहोत. याची प्रचिती विधानसभा
उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतून दिसून आली.
विधानसभा उपाध्यक्षांची घोषणा होण्याची
औपचारिकता आता शिल्लक आहे. उद्या (26 मार्च) सभागृहात विधानसभा अध्यक्ष
राहुल नार्वेकर यांच्याकडून विधानसभा उपाध्यक्षांची घोषणा केली जाणार आहे.
या पदासाठी तीन नावे चर्चेत होती. मात्र अजित पवारांचे कट्टर समर्थक
राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांची या पदावर वर्णी
लागली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आमदार आणि अजित पवारांचे कट्टर समर्थक अण्णा दादू
बनसोडे यांची आमदारपदाची ही तिसरी टर्म आहे. पिंपरी मतदारसंघातून ते सर्व
प्रथम 2009 मध्ये विजयी झाले. त्यानंतर 2019 आणि 2024 असे सलग दोन वेळा ते
पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीनंतर अण्णा बनसोडे यांनी अजित
पवारांची साथ दिली.
आमदार अण्णा बनसोडे यांचा जन्म 4 मे 1968 साली झाला. त्यांचे शिक्षण बारावी आणि आयटीआय असे झाले आहे. अण्णा बनसोडे हे सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत. त्यांची राजकीय कारकिर्द खऱ्या अर्थाने 1997 मध्ये पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत नगरसेवक पदापासून झाली. त्यानंतर 2002 मध्ये सलग दुसऱ्यांदा ते नगरसेवक म्हणून निवडून आले. दरम्यानच्या काळात ते स्थायी समितीचे अध्यक्ष होते.अण्णा बनसोडे यांनी 2009 साली पिंपरी विधानसभा मतदारसंघ -206 या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव मतदारसंघातून पहिल्यादा निवडणूक लढवली आणि आमदार म्हणून ते विधानसभेत पोहचले. 2014 मध्ये शिवसेनेकडून त्यांचा पराभव झाला. मात्र त्यानंतर 2019, 2024 असे सलग दोनदा ते याच मतदारसंघातून विजयी झाले. आमदारकीची त्यांची ही तिसरी टर्म आहे. अजित पवार यांचे कट्टरसमर्थक म्हणून अण्णा बनसोडे ओळखले जातात. अजित पवारांनी पक्षातून फुटून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्या काही आमदारांमध्ये अण्णा बनसोडे देखील त्यांच्या सोबत होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.