सांगली, दि.२५ : विद्यावाचस्पती ह. भ. प. डॉ. संजय गुरुनाथ कोटणीस महाराज यांना विश्व संस्कृतिक व पर्यावरण संरक्षण आयोगाने भारत गौरव रत्न सन्मान पुरस्कार देऊन गौरवले आहे. केंद्र सरकारच्या निती आयोगाच्या अंतर्गत काम करणाऱ्या या आयोगाचे तह आयात सभासदत्वही डॉ. कोटणीस यांना देण्यात आले आहे. अध्यात्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी केलेले काम आणि त्यांच्या कोटणीस घराण्याची अध्यात्म आणि कीर्तनपरंपरा यांच्या सन्मानार्थ हा पुरस्कार देण्यात आला आहे.
परमपूज्य सद्गुरु तात्यासाहेब कोटणीस महाराज यांनी सन१८९० पासून सांगलीत जी कीर्तन परंपरा सुरू केली ती प.पू. दादासाहेब कोटणीस महाराजांनी सन १९२४ ते सन १९७० पर्यंत जोपासली आणि विकसित केली. तेव्हापासून तीच परंपरा दादासाहेब यांचे चिरंजीव प.पू. गुरुनाथ कोटणीस महाराजांनी आजपर्यंत सांभाळली आहे. वयाच्या ८२ व्या वर्षीही ते नित्य कीर्तन करीत आहेत. त्यांचे चिरंजीव डॉ. संजय कोटणीस तीच किर्तन परंपरा चौथ्या पिढीतही पुढे चालवीत आहेत. आध्यात्मिक, सांस्कृतिक तसेच सामाजिक क्षेत्रातही ते सतत कार्यरत आहेत.
पंडित दीनदयाळ उपाध्याय हिंदी विद्यापीठ (वृंदावन, मथुरा) यांच्यातर्फे त्यांना काही महिन्यांपूर्वीच अध्यात्मिक आणि सामाजिक कार्य यासाठी विद्यावाचस्पती (डॉक्टरेट )पदवीने सन्मानित करण्यात आले आहे. वारकरी आचारसंहिता परिषदेचे संस्थापक आचार्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी डॉ. संजय कोटणीस यांची परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र संघटनप्रमुखपदी नियुक्ती केली आहे.ह. भ. प. डॉ.संजय कोटणीस महाराज हे रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, दासबोध, भगवद्गीता, संत चरित्र अशा विषयांवर प्रवचने आणि व्याख्याने देतात. नव्या पिढीतील प्रभावी प्रवचनकार आणि कीर्तनकार म्हणून त्यांचा लौकिक आहे. सांगली, कोल्हापूर, पुणे, सातारा, रत्नागिरी आणि राज्यातील अनेक जिल्ह्यात त्यांची प्रवचने आणि कीर्तने झाली आहेत. धर्म आणि संस्कृती प्रचाराचे त्यांचे काम अखंडपणे सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.