लाडक्या बहिणीचे पैसे कुठं गेले? विचारताच बायकोवर कोयत्याने हल्ला
महाराष्ट्र सरकारच्या 'लाडकी बहीण' योजनेच्या निधीवरून अनेक कुटुंबांत वाद होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना सोलापूरच्या माढा तालुक्यात घडली आहे. मिळालेल्या पैशांबद्दल विचारणा केल्याने पती आणि सासूने पत्नीवर कोयत्याने हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
माढा तालुक्यातील लोणी येथे राहणाऱ्या निशा लोंढे (पीडित महिला) यांना सरकारच्या 'लाडकी बहीण' योजनेतून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे पैसे मिळाले होते. मात्र, त्यांचा पती धनाजी लोंढे याने हे पैसे परस्पर काढले. पत्नीने हे पैसे काढल्याबद्दल विचारणा केली असता, नवरा आणि सासूने वाद घालण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर थेट कोयत्याने हल्ला केला. पत्नी 'माझे पैसे तुम्ही का काढले?' असा जाब विचारताच, नवऱ्याने वाद घालण्यास सुरुवात केली. सासू रूपाबाई लोंढेही या वादात सहभागी झाली आणि दोघांनी मिळून निशाला बेदम मारहाण केली.
हल्ल्यात निशा गंभीर जखमी झाली असून तिच्या पाय, गुडघा आणि हातावर कोयत्याने वार करण्यात आले. जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर माढा पोलीस ठाण्यात पती धनाजी लोंढे आणि सासू रूपाबाई लोंढे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेच या प्रकरणाचा तपास हेड कॉन्स्टेबल रोपळे करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.