"ढोंगीपणाला कोणतीही सीमा नाही"; तीन तासांच्या पॉडकास्टवरून काँग्रेसचा PM मोदींवर हल्लाबोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांच्या यूट्यूब चॅनलवर पॉडकास्टसाठी मुलाखत दिली. तब्बल तीन तासांहून अधिक वेळ चाललेल्या या मुलाखतीमध्ये मोदींनी विविध विषयांवर भाष्य केले आहे. पॉडकास्टमध्ये त्यांच्या आयुष्यातील विविध घडामोडींसह आरएसएस आणि हिंदु राष्ट्र, महात्मा गांधींसह इतर अनेक मुद्द्यांवर त्यांनी आपले मत मांडले. मात्र आता त्यांच्या या मुलाखतीवरून काँग्रेसने मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदींनी कधीही पत्रकार परिषद घेतली नाही पण त्यांना अमेरिकन पॉडकास्टरसमोर बसणे सोयीचे वाटते, अशी टीका काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केली आहे.
जयराम रमेश यांचे द्वीट
"पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांना सामोरे जाण्यास घाबरणारी व्यक्ती परदेशी पॉडकास्टरसमोर आरामात बसते. टीका सहन करणं हा लोकशाहीचा आत्मा आहे असे सांगण्याचे धाडस पंतप्रधान मोदी यांच्याकडे आहे, मात्र आपल्या सरकारला जबाबदार धरणारी प्रत्येक संस्था त्यांनी उद्ध्वस्त केली आहे. इतिहासात असं कोणतेच उदाहरण नाही ज्यात अशा सूडभावनेने त्यांच्या टीकाकारांच्या मागे लागतात. ढोंगीपणाला कोणतीही सीमा नाही," असं जयराम रमेश यांनी म्हटलं. पंतप्रधान मोदी टीकाकारांविरुद्ध सूडबुद्धीने वागतात, असे जयराम रमेश यांनी द्वीटद्वारे सांगितले आहे.
यावेळी पंतप्रधान मोदींनी युक्रेन आणि रशियातील युद्धावरही भाष्य केले. 'ही वेळ युद्धाची नाही', असे म्हणत पंतप्रधान मोदींनी पुतिन आणि झेलेन्स्की यांना मोलाचा सल्ला दिला असल्याचे दिसत आहे. याशिवाय अमेरिकेसह पाकिस्तानशी असलेल्या संबंधांबद्दल आपले मत व्यक्त केले. या पॉडकास्टमध्ये २००२ गुजरात दंगली या विषयावर मोदींनी बाजू मांडली. गुजरात दंगलीसंबंधित संभ्रम पसरवण्यात आल्याचेही मोदी म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.