इचलकरंजी : रस्त्याच्या मध्यभागी अडकलेली केबल टाळण्याच्या प्रयत्नात मोटारसायकल घसरली आणि बाजूने जाणाऱ्या एसटी बसच्या मागील चाकात सापडून निवृत्त शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. विजयकुमार बाळासो चौगुले (वय ६०, यड्राव
फाटा, इचलकरंजी) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. ही घटना काल सकाळी साडेआठ
वाजण्याच्या सुमारास सांगली नाका ते इचलकरंजी मार्गावर आनंद गेस्ट हाऊससमोर
घडली.
गावभाग पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विजयकुमार चौगुले हे सेवानिवृत्त शिक्षक एका ॲकॅडमीत मार्गदर्शनासाठी जात असत. गेल्या वर्षी ते सेवेतून निवृत्त झाले होते. शनिवारी हनुमान जयंती असल्याने त्यांनी सकाळी मंदिरात दर्शन घेऊन डॉक्टरांकडे जाण्याचे ठरवले होते. चौगुले हे मोटारसायकलवरून जात असताना सांगली नाक्यावर रस्त्यावर पडलेल्या केबलमध्ये त्यांच्या दुचाकीचे चाक अडकले. त्यामुळे तोल जाऊन ते रस्त्यावर कोसळले. त्याचवेळी बाजूने भरधाव वेगात येणारी एसटी बस त्यांच्या अंगावरून गेली. बसचे मागील चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी एसटी बस चालक पुंडलिक सदाशिव कुंभार (वय ४७, रा. कुंभारवाडा, बोरवडे, ता. कागल) याच्याविरुद्ध गावभाग ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
कर्तव्यनिष्ठ शिक्षकाचा दुर्दैवी अंत
सकाळी
दर्शनासाठी निघालेले विजयकुमार चौगुले यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू
झाला. त्यांच्या मृतदेहाची अवस्था पाहून कुटुंबीयांनी हंबरडा फोडला.
त्यांच्या मागे पत्नी राजश्री आणि चेन्नईत नोकरी करणारा मुलगा शुभम असा
परिवार आहे. कर्तव्यनिष्ठ शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती.
रस्ते काम आणि पडलेली केबल कारणीभूत
चौगुले यांच्या मृत्यूमागे केवळ एसटी नव्हे, तर सुरू असलेले रस्त्याचे अर्धवट काम आणि पडलेली केबलदेखील जबाबदार असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. स्थानिक नागरिकांनीही घटनास्थळी या संदर्भात संताप व्यक्त करत संबंधित यंत्रणांविरोधात तक्रारी केल्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.