Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :- महाराष्ट्र खंडणीखोरांचे राज्य बनलेय:, पृथ्वीराज चव्हाण

सांगली :- महाराष्ट्र खंडणीखोरांचे राज्य बनलेय:, पृथ्वीराज चव्हाण
 

सांगली : देशात धार्मिक ध्रुवीकरण करून निवडणुका जिंकल्या जात आहेत. विरोधी पक्षांचा आवाज दाबला जात आहे. विरोधी विचारांची माणसे संपवली जात आहेत. पक्ष फोडून विरोधी विचार संपवला जात आहे. त्यातूनच देशाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने चालली आहे. महाराष्ट्र हे खंडणीखोरांचे राज्य झाले आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.

यावेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, देश सध्या संक्रमण स्थितीतून जात आहे. पहलगाम येथे हल्ला झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला. त्यावर सर्वपक्षीयांची बैठक झाली. पंतप्रधानांच्या निर्णयाला आम्ही पाठिंबा दिला आहे. आता सरकारने घेतल्या जात असलेल्या निर्णयांची वेळोवेळी माहिती द्यायला हवी.
देश एकसंध आहे, हा संदेश जगभर जायला हवा. ज्याप्रमाणे पहलगाम हल्ल्यानंतर सर्वपक्षीयांना विश्वासात घेतले, त्याप्रमाणे अमेरिकेने जे व्यापार युद्ध छेडले आहे, त्याबाबतही विश्वासात घ्यायला हवे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एकतर्फी व्यापार युद्ध छेडले आहे. त्याचा जगावर परिणाम होणार आहे. जागतिक व्यापार संघ उद्ध्वस्त झाला आहे. याचा परिणाम होऊन महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. बेरोजगारी, मंदी असे प्रश्न निर्माण होणार आहेत. भारत-अमेरिका व्यापारी करार करताना भारत अमेरिकेच्या दबावाखाली राहील का, अशी भीती वाटते. अमेरिकेच्या दबावाखाली भारताने राहू नये.

ते म्हणाले, महाराष्ट्रामध्ये जे राजकारण सध्या सुरू आहे, ते बरोबर नाही. खंडणीखोरांचे राज्य वाटत आहे. बीड जिल्हा हे त्याचेच उदाहरण आहे. अनेक जिल्ह्यात औद्योगिक गुंतवणूक होत नाही. गुंतवणूकदारांना भयमुक्त वातावरण हवे आहे. मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांना थेट आवाहन करून तक्रार देण्यास सांगायला हवे. अनेक उद्योग महाराष्ट्राबाहेर जात आहेत. महाराष्ट्र हा औद्योगिक क्षेत्रात आता पहिल्या क्रमांकावर राहिलेला नाही. दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राचा क्रमांक अकरावा झाला आहे. या सगळ्याला सरकार जबाबदार आहे. शेतकर्‍यांची स्थिती बिकट आहे. शेतकर्‍यांना जी आश्वासने देण्यात आली, त्याची अंमलबजावणी झालेली नाही. लाडकी बहीण योजनेत फसवणूक झाली आहे. शेतकरी कर्जमाफी ही सुध्दा फसवी घोषणा आहे.
ते म्हणाले, सत्तेतील तीन पक्षांत तणाव आहे. त्यांच्यात अंतर्गत स्पर्धा आहे. प्रशासन कोलमडले असून प्रशासनावर सरकारचा वचक राहिलेला नाही. जगातील दोनशे देशांपैकी दरडोई उत्पन्नात भारताचा 140 वा क्रमांक लागत आहे. विकास दर दहा टक्के आवश्यक असताना तो केवळ 6 टक्के आहे. लोकांना दिवास्वप्न दाखवून फसवणूक केली जात आहे. या सर्वामुळे कंत्राटदार व कमिशनखोरांचे राज्य बनले आहे. त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप सरकार जबाबदार आहे. पक्षांतर करून सत्ता स्थापन केली जाते. त्यावर न्यायालयसुद्धा टिप्पणी करत नाही. यावरून देशाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने चालल्याची दिसून येत आहे.
देशात दोन राष्ट्रीय पक्ष आवश्यक

चव्हाण म्हणाले, अमेरिका, इंग्लंड यासारख्या देशामध्ये दोन राष्ट्रीय पक्ष आहेत. भारतामध्ये काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष होता. आता भाजपही राष्ट्रीय पक्ष बनला आहे. मात्र हा पक्ष विरोधी विचार संपवत आहे. अनेक प्रादेशिक पक्ष आहेत. मात्र त्यांना मर्यादा आहेत. अमेरिका, इंग्लंड देशाप्रमाणे भारतातसुद्धा दोन राष्ट्रीय पक्ष असायला हवेत.

केवळ रस्ते म्हणजे विकास नाही
चव्हाण म्हणाले, समृद्धी महामार्गासारखे सिमेंटचे रस्ते केले म्हणजे त्याला विकास म्हणता येणार नाही. सर्वांगीण विकास होण्यासाठी चांगले शिक्षण, आरोग्य, संशोधन या गोष्टीसुद्धा आवश्यक आहेत. शेतकर्‍यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे. त्याला विकास म्हणता येईल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.