सांगलीत जयंत पाटलांच्या राजकीय वर्चस्वालाच आव्हान
सांगली: चार माजी आमदारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातील प्रवेशाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चुरशीच्या होणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्ष विस्तार करत असताना भाजपशी सलोखा ठेवत विधानसभेच्या तासगाव आणि इस्लामपूर या दोन जागा लढविल्या होत्या.
दोन्ही ठिकाणी पक्षाला पराभव पत्करावा लागला असला तरी जिल्ह्यात पक्षविस्तारासाठी प्रयत्न सुरूच ठेवले आहेत. यातूनच चार माजी आमदार डेरे दाखल झाले असून यामुळे राष्ट्रवादी काँग्र्रेस (शरद पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या राजकीय वर्चस्वाला खीळ घालण्याचे प्रयत्न दिसत आहेत.
गेल्या सहा महिन्यापासून जिल्ह्यात राजकीय मरगळ आल्याचे दिसत असले तरी वरून शांत दिसत असलेल्या राजकीय क्षेत्रात अंतर्गत खळबळ मात्र सुरू आहे. भाजपचा लोकसभेत पराभव झाला असला तरी विधानसभा निवडणुकीत महायुतीने आठ पैकी पाच जागा जिंकल्या आहेत, तर इस्लामपूर आणि पलूस-कडेगाव या दोन मतदार संघात विरोधकांचे मतदान मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आ. जयंत पाटील व आ. डॉ. विश्वजित कदम यांचा अत्यल्प मतांनी झालेला विजय एक प्रकारे नकारात्मक मतदान वाढत असल्याचे निदर्शक मानले जात आहे. या दोन मतदार संघावर महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादीने लक्ष केंद्रित केले आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपंचायत आणि नगरपालिका यांच्या निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नसल्या तरी पावसाचा हंगाम संपल्यानंतर या निवडणुका कधीही होउ शकतील अशी अटकळ बांधून महायुतीतील घटक पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. या तुलनेत एकेकाळी बालेकिा म्हणून मिरवणारी काँग्रेस गलितगात्र झाली आहे. रूसवे-फुगवे सुरू असून ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष व शहर जिल्हाध्यक्ष पक्ष वाढीऐवजी गट वाढीवरच लक्ष केंद्रित करत असल्याचे दिसत आहे. यामुळे पक्ष कार्यक्षम राहावा यासाठी कोणताही कार्यक्रम नाही, आंदोलन नाही. यामुळे भविष्यात काँग्रेसला जनाधार असला तरी निवडून येण्याची क्षमता असलेले कार्यकर्ते पक्षात राहतील की नाही याची शंका वाटत आहे.
याच स्थितीचा फायदा घेत राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने अन्य पक्षात नाराज असलेल्यांना आपल्याकडे घेण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये जतचे विलासराव जगताप, तमणगोंडा रवि पाटील, शिराळ्याचे शिवाजीराव नाईक, आटपाडीचे राजेंद्रअण्णा देशमुख यांच्यासह कवठेमहांकाळचे अजितराव घोरपडे हे आता या अजितदादांचे शिलेदार ठरणार आहेत. पक्षाने मिरजेचे इद्रिस नायकवडी यांना विधान परिषदेचे सदस्यत्व दिले असल्याने आणखी काही नेत्यांना आमदारकी मिळेल याची चिन्हे नसताना ही मंडळी सत्तेच्या सावलीत विसावली आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार या पक्षांना भविष्यात चांगले दिवस येतील असे दिसत नसल्यानेच ही मंडळी अजितदादा गटात गेली आहेत. याच बरोबर काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष मुन्ना कुरणे, भाजपचे जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष अनिल पाटील ही मंडळीसुध्दा या पक्षात गेली आहेत. यामागे केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हेच एकमेव कारण आहे.
भाजपला पक्ष विस्ताराची आता फारशी गरज उरलेली नाही. कारण गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सत्ता आता हाती असल्याने विस्ताराची फारशी गरजच नाही. महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती या पक्षानेही पक्ष विस्ताराला प्राधान्य दिले असून गाव पातळीवरील दुय्यम नेत्यांची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी यासाठी प्रयत्न सुरू असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या जागा वाटपात हा पक्षही वाटेकरी राहण्याची चिन्हे आहेत. ज्या काही संस्था, ग्रामपंचायती ताब्यात आहेत, त्या कायम ठेवण्याबरोबरच आणखी काही तरी मिळवण्यासाठी कोँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला आता शर्थीचे प्रयत्न करावे लागतील यात शंका नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.