दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केंद्र सरकारला प्रश्न विचारण्याबद्दल आणि सामाजिक मुद्द्यांवर आपलं बेधडक मत व्यक्त केलं. प्रकाश राज हे त्यांच्या रोखठोक
स्वभावासाठी ओळखले जातात. अनेकदा त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
या मुलाखतीत त्यांनी म्हटलंय की सरकारच्या धोरणांवर आणि निर्णयांवर प्रश्न
विचारणं हा त्यांचा अधिका आहे. कारण लोकशाहीमध्ये नागरिकांना सरकारकडून
उत्तरं मागण्याचा अधिकार आहे. “माझी टीका कोणत्याही विशिष्ट व्यक्तीविरोधात
नाही, तर समाजातील वाढती असमानता आणि धार्मिक कट्टरतेविरोधात आहे”, असंही
त्यांनी स्पष्ट केलं.
प्रकाश राज यांनी मंदिर-मस्जिदसारख्या
वादग्रस्त मुद्द्यांवर टिप्पणी करताना म्हटलं की, जर यात खोलवर गेलो तर
तिथे बुद्धांची शिकवण मिळेल, जे शांती आणि करुणेविषयी सांगतं. ‘लल्लनटॉप’ला
दिलेल्या मुलाखतीत प्रकाश राज म्हणाले, “लोक नेहरुंबद्दल विचारतात, जेव्हा
त्यांचं निधन झालं होतं तेव्हा मी जन्मालाही आलो नव्हतो. मी काय करू? मी
तिथे जाऊ का आणि मी कुठपर्यंत खोदून जाईन? औरंगजेब.. जाणार का? आज तुम्ही
मशीद खोदली की तुम्हाला मंदिर दिसेल. जर तुम्ही मंदिर खोदलं तर तुम्हाला
बुद्ध सापडतील. भाऊ, तू कुठपर्यंत खोदत जाणार? टिपू सुलतानशी माझा काय
संबंध, औरंगजेबाशी माझा काय संबंध? हा कदाचित मी झोपलो आणि उशिरा उठलो ही
समस्या असेल का? माझ्या प्रश्नावरून समस्या अशी आहे की मी प्रश्न विचारतोय.
हीच तुमची समस्या आहे.”
प्रकाश राज यांनी यावेळी मोदी सरकारवर निशाणा साधला आणि धार्मिक स्थळांबाबत सुरू असलेल्या वादांवर प्रश्न उपस्थित केले. “धार्मिक उन्मादात अडकण्याऐवजी समाजाने शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यांसारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. मंदिर-मशीदसारखे वाद केवळ लोकांमध्ये फूट पाडतात. देशाच्या खऱ्या समस्यांवर एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. मी कोणत्याही सरकारच्या विरोधात नाही. परंतु जर कोणतंही चुकीचं धोरण आखलं गेलं तर त्याचा विरोध करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे”, असं ते पुढे म्हणाले.प्रकाश राज यांनी असंही स्पष्ट केलं की, त्यासाठी त्यांना कितीही टीका सहन करावी लागली तरी ते त्यांचे विचार मोकळेपणे व्यक्त करण्यापासून कधीही मागे हटणार नाहीत. “एक कलाकार म्हणून समाजाला आरसा दाखवणं आणि लोकांना विचार करण्यास प्रेरित करणं ही माझी जबाबदारी आहे. प्रश्न विचारणं आणि सत्य बोलणं ही लोकशाहीची खरी ताकद आहे. तरुणांनी कोणत्याही मुद्द्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नये, तर वस्तुस्थिती तपासून पहा आणि काय बरोबर आहे, काय चूक आहे ते स्वत: ठरवा”, असा सल्ला त्यांनी दिला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.