कोणाला हवी नागपुरात बदली, कोणाला हवी पोलीस जाचातून मुक्तता, भाजप पक्षप्रवेशा मागची कारणे काही वेगळीच !
नागपूर : भविष्यात कधी तरी जिल्हा परिषद निवडणुका होणार म्हणून आत्तापासूनच तयारीला लागलेल्या भारतीय जनता पक्षाला आपल्या स्वसामर्थ्यावर विश्वास नसल्याने इतर पक्षातील माजी जिल्हा परिषद सदस्यांना पक्षात प्रवेश देणे सुरू केले आहे.
भाजपमध्ये जोरात इन्कमिंग सुरू असल्याचे चित्र रंगवण्यात येत असले तरी प्रत्यक्षात येणारे नेते भाजपच्या विचारसरणीवर विश्वास ठेवून येत नाही तर त्यांच्या व्यक्तिगत कारणापोटी येत असल्याचे आता हळूहळू स्पष्ट होत आहे.
अलीकडेच हिंगणा विधानसभा मतदारसंमघातील काही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या माजी सदस्यांनी भाजपात प्रवेश केला तर दोनच दिवसांपूर्वी रामटेक तालुक्यातील विरोधी पक्षाच्या माजी जिल्हा परिषद सदस्याने कमळ हाती घेतले. एक सोहोळा पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी तर दुसरा पालकमंत्र्यांच्याच उपस्थितीत एका सार्वजनिक कार्यक्रमात पार पडला. विरोधी पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य एका पाठोपाठ एक भाजपमध्ये प्र्वेश करीत असल्याने विरोधी पक्ष दुबळा तर भाजप महाशक्तीमान होत असल्याचा प्रचार व प्रसार भाजपकडून केला जात आहे. मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळे असल्याची माहिती राजकीय वर्तुळातूनच सांगितली जात आहे. जे सदस्य भाजपमध्ये गेले ते या पक्षाच्या प्रेमापोटी, विचारधारा किंवा नेतृत्वाप्रती आकर्षणापोटी गेलेले नाहीत तर पक्ष सत्तेत असल्याने त्यांची काही व्यक्तीगत कामे मार्गी लागेल या आशेपोटी गेले आहेत. तशा अटी व शर्ती ठेवूनच ते गेल्याचे त्यांच्या जुन्या पक्षातील नेते सांगत आहेत.
पतीला हवी नागपुरात बदली, पत्नी भाजपात
हिंगणा तालुक्यातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काही कार्यकर्ते व स्थानिक स्वराज्य संस्थांचे माजी सदस्य भाजपात गेले. पवार गटाला खिंडार पडले, अशा बातम्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या. मुळात जे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते भाजपमध्ये गेले ते २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपासूनच भाजपशी संपर्कात आहे. तीन महिन्याने पक्ष प्रवेशाची औपचारिकता पूर्ण झाली. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या एका महिला नेत्याने भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी उत्पादन शुल्क खात्यात निरीक्षक असलेल्या व सध्या यवतमाळ जिल्ह्यात सेवेत असलेल्या पतीला नागपुरात बदली करून देण्याची अट घातली. विशेष म्हणजे हे खाते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे म्हणजे शंभूराजे देसाई यांच्याकडे आहे. तरीही भाजपने सर्वसंबधित महिला नेत्याला तुमचे काम होईल, असे आश्वस्थ केले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्वी या महिला नेत्या ज्या पक्षात होत्या तेव्हा विद्यमान आमदारांनी या बदलीला विरोध दर्शवला होता. पण आता त्यांच्याच पक्षात त्या नेत्या आल्याने ही बदली होईल, असे उत्पादन शुल्क खात्यातील सुत्रांनी सांगितले. याचाच अर्थ संबंधित महिला नेत्या यांचा भाजप प्रवेश भाजप प्रेमापोटी नव्हे तर बदलीसाठी होता अशी चर्चा आहे.
पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी भाजप प्रवेश ?
दोन दिवसापूर्वी कामठी शहरात भाजपचा एक मेळावा झाला. यामेळाव्यात कॉंग्रेसच्या एका माजी जिल्हा परिषद सदस्याने भाजपमध्ये प्रवेश केला. या नेत्याची पार्श्वभूमी भाजपला मान्य असणारी नाही, तरीही ते भाजप प्रवेश कर्ते झाले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस ससेमिरा टाळण्यासाठीच हा पक्ष प्रवेश होता, अशी माहिती आहे. संबंधितांचे पुण्यातील एका प्रकरणाची या पक्ष प्रवेशामुळे जोरदार चर्चा आहे. काँग्रेस नेते सुनील केदार यांना धक्का असे स्वरुप या पक्ष प्रवेशाला दिले जात असले तरी केदार हे भाजपच्या सर्व रणनितीला तोंड देत त्यांच्याशी त्यांच्याच पद्धतीने जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न करीत आहे. एकूणच भाजपमधील इनकमिंगच्या चर्चेचा पोकळपणा वरील घडामोडींमुळे उघड झाला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.