महिलेच्या पोटात बाळ, प्रसुतीकळा सुरु झाल्या पण डॉक्टर दारूच्या नशेत झिंगाट, नाशिकमधील धक्कादायक प्रकार
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव ग्रामीण रुग्णालयात घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे संतापाची लाट उसळली आहे. रुग्णालयातील एका डॉक्टरने मद्यधुंद अवस्थेत कर्तव्यावर असताना प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलांना ताटकळत ठेवले. या निष्काळजीपणामुळे प्रसंगी गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे शिवसैनिकांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी डॉक्टरला चोप दिला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नांदगाव ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी रुग्ण दाखल असतानाही डॉक्टर मद्यधुंद अवस्थेत होते. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे काही वेळ रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय होत होती. तर एका महिलेला प्रसुतीकळा देखील सुरु झाल्या होत्या. या घटनेची माहिती मिळताच शिवसैनिकांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली आणि त्यांनी डॉक्टर व कर्मचाऱ्यांना जाब विचारला.
डॉक्टर व कर्मचाऱ्यांना शिवसैनिकांकडून चोप
शिवसैनिकांना जाब विचारल्यानंतर एका महिलेला आधी सिझेरियन (शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती) सांगितलेली असताना प्रत्यक्षात मात्र त्या महिलेची साधारण प्रसूती झाल्याचे समोर आले. यानंतर संतप्त शिवसैनिकांनी संबंधित डॉक्टरला चोप दिलाय. तर या प्रकरणाची गंभीर दखल घेत सिव्हिल सर्जन डॉ. चारुदत्त शिंदे यांनी संबंधित मद्यधुंद डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, या घटनेनंतर इतर नागरिकांनीही रुग्णालयातील पूर्वीच्या तक्रारींचा पाढा वाचायला सुरुवात केली आहे. आता मद्यधुंद डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर नेमकी कारवाई कधी होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नांदगाव ग्रामीण रुग्णालयातील इतर तक्रारी
• डॉक्टरांवर ग्रामीण रुग्णालयातील दाखले मिळविण्यासाठी पैसे घेत असल्याचे आरोप.
• शव विच्छेदन करण्यासाठी देखील एक हजार रुपये नातेवाईकांकडून घेतले जातात.
• डॉक्टर व कर्मचाऱ्यांकडून रुग्णांशी नेहमीच गैरवर्तणूक केली जाते, उडवाउडवीचे उत्तरे दिली जातात.
• सामान्य प्रसूती ऐवजी सिझेरियन प्रसूतीचा सल्ला दिला जातो.
• रुग्णांना नेहमीच बाहेर रुग्णालयात रेफर केले जाते.
• दुपारी एक नंतर ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर हजर नसतात.
• शासकीय रुग्णालय असतांनाही रुग्णांना बाहेरून खाजगी मेडिकल मधून औषधे आणावयास सांगितले जाते.
असे अनेक आरोप व तक्रारी नागरिकांनी केलेल्या आहेत.
वणी-कळवण रस्त्यावर अपघात, युवकाचा मृत्यू
दरम्यान, वणी कळवण रस्त्यावर पायर पाडा फाट्याजवळ पिकअप व मोटारसायकलच्या झालेल्या अपघातात एक युवक ठार तर दोन जखमी झाल्याची घटना घडली आहे. अहिवंतवाडी फाट्याच्या पुढे पायरपाडा फाट्याजवळ असलेल्या वळणावर वणी बाजूकडून येणारी चारचाकी पिकअप क्रमांक (एम.एच. 41 ए.यु. 8798) कळवण बाजूकडे जात असतांना मोटारसायकल कमांक (एम.एच 15 एच.डी.1154) हीस समोरून धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात मोटारसायकलवरील तरुण पोपट हिरामण भोये (25) रा. औताळे यांच्या पोटास मार लागून त्यांच्या पोटातील आतडी तुटून बाहेर येऊन रक्तश्राव होऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे सोबत असलेला चुलत भाऊ संदीप संजय भोये व धनराज कृष्णा पालवी हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.