शारीरिक संबंधाला नकार, पत्नीला पेटवून पती फरार; पोलिसांनी दाखल केला गुन्हा
मुंबई : शारीरिक संबंधाला नकार दिला म्हणून पत्नीला पतीने पेटवून दिले. या घटनेनंतर पती पळून गेल्याने त्याच्याविरोधात आरसीएफ पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. दरम्यान गंभीररीत्या भाजलेल्या पत्नीवर सायन रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जाते.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना शुक्रवारी (30 मे) दुपारी साडेबारा वाजता चेंबूर येथील वाशीनाका परिसरात घडली आहे. याच परिसरात जखमी महिला ही तिच्या पतीसोबत राहत असून ती घरकाम करून स्वतःच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालविते. शुक्रवारी दुपारी ती कामावर जात होती. तिला आधीच खूप उशीर झाला होता, त्यामुळे घरातील काम उरकून ती कामावर जात होती. त्याचवेळी तिच्या पतीने तिच्यासोबत शारीरिक संबंधासाठी आग्रह धरला होता. महिलेने नकार देताच पतीने तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली, तसेच तिचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप करून तिला टोमणे मारत होता. पतीच्या बोलण्याचा राग आल्याने महिलेने अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटविण्याचा प्रयत्न केला. मात्र माशीसची काडी लागली नाही. अशावेळी पतीने भात शिजत असलेल्या गॅसच्या जाळावर कागद पेटवून तो पत्नीच्या अंगाला लावून तिला पेटवून दिले. गंभीर जखमी झालेल्या महिलेने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यानंतर स्थानिक रहिवाशांनी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गंभीररीत्या भाजलेल्या महिलेला तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे महिलेवर उपचार सुरू आहेत.
सदर घटनेची माहिती मिळताच आरसीएफ पोलिसांनी सायन रुग्णालयात धाव घेतली. यावेळी उपचार घेणाऱ्या महिलेची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. महिलेच्या जबानीनंतर पोलिसांनी तिच्या पतीविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. मात्र या घटनेनंतर आरोपी पती घरातून पळून गेला आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.