Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'टर्बन टोरनॅडो'चा अखेरचा श्वास; महान मॅरेथॉनपटू सरदार फौजा सिंह यांचे 114 व्या वर्षी अपघाती निधन

'टर्बन टोरनॅडो'चा अखेरचा श्वास; महान मॅरेथॉनपटू सरदार फौजा सिंह यांचे 114 व्या वर्षी अपघाती निधन
 

मुंबई: जगभरातील क्रीडाप्रेमींसाठी एक धक्कादायक बातमी आहे. 'टर्बन टोरनॅडो' म्हणून ओळखले जाणारे जगप्रसिद्ध मॅरेथॉन धावपटू सरदार फौजा सिंह यांचे वयाच्या114 व्या वर्षी अपघाती निधन झाले आहे. पंजाबमधील जालंधर जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी, बीयास येथे सोमवारी दुपारी 3.30 वाजता एका अज्ञात वाहनाने धडक दिल्यानंतर ही दुर्दैवी घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातानंतर फौजा सिंह यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या शरीरावर रक्ताचे डाग असलेले फोटो, स्ट्रेचरवर नेतानाचे व्हिज्युअल्स सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

शाश्वत प्रेरणादायी आयुष्य
फौजा सिंह यांनी 89 व्या वर्षी वैयक्तिक दुःखावर मात करण्यासाठी धावण्याची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. 100 व्या वर्षी पूर्ण मॅरेथॉन पूर्ण करणारे ते पहिले व्यक्ती ठरले. त्यांच्या या विक्रमी कामगिरीने त्यांना आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवून दिली. त्यांना "Turbaned Tornado" म्हणून ओळखले जायचे. कारण त्यांनी वयोमानाची मर्यादा ओलांडत विविध वयोगटांमध्ये जागतिक विक्रमांची मालिका प्रस्थापित केली. त्यांच्या धावण्यातील सातत्य, मनोबल आणि शारीरिक तंदुरुस्तीने ते आरोग्य, दीर्घायुष्य आणि जिद्दीचे जागतिक प्रतीक बनले. फौजा सिंह यांचे जीवन म्हणजे धैर्य, समर्पण आणि प्रेरणेचे मूर्तिमंत उदाहरण. वय ही केवळ संख्या आहे, हे त्यांनी जगाला दाखवून दिले. त्यांच्या निधनाने एक युग संपले असले तरी त्यांची कथा पुढच्या पिढ्यांना धावण्याची, लढण्याची आणि जगण्याची ऊर्जा देत राहील. सरदार फौजा सिंह यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर सोशल मीडियावर शोक व्यक्त केला जात आहे.

 


 




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.