आम्ही जर आमच्या औकातीवर उतरलो तर...; दुसऱ्यांदा ट्वीट करत सुशील केडिया यांची राज ठाकरेंना धमकी
मुंबई : महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादानं आता मराठी विरुद्ध अमराठी असं रूप घेतलं आहे. त्यातच मराठीमध्ये बोलल्यानं मीरारोड येथे एका दुकानदाराला मारहाण करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती.
त्या पार्श्वभूमीवर आता एक प्रसिद्ध व्यावसायिक आणि केडियोनॉमिक्सचे संस्थापक सुशील केडिया यांनी मराठीप्रेमींना डिवचणारं विधान केलं आहे. ते म्हणाले की, 'मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा', असं केडिया यांनी एक्सवर (ट्वीट) शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये राज ठाकरे यांना टॅग करत म्हटलं आहे.
एक्सवरील आपल्या अकाउंटवरून राज ठाकरे यांना टॅग करत सुशील केडिया यांनी लिहिलं आहे की, 'गेली ३० वर्ष मुंबईत राहिल्यानंतरही मला मराठी भाषा फारशी कळत नाही. तसंच तुम्ही ज्याप्रकारे गैरवर्तन करत आहात ते पाहता जोपर्यंत तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांची काळजी घेण्याचं नाटक करण्याची परवानगी दिली जात राहील, तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही, काय करायचं बोला?', असं आव्हान सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना दिलं आहे.
केडीया यांनी राज ठाकरे यांना टॅग करत पुढे म्हटलं आहे की, 'ड्रामा बंद कर तुमचे दोन-तीन गुंडे १०-१२ फटके मारतील तर मारतील. आम्ही जर आमच्या औकातीवर उतरलो तर आणि जोपर्यंत तू हात जोडून माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण केलं तर, तुझं काय राहणार?' असं देखील त्यांनी एक्सवर (ट्वीट) म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वी मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी मीरा रोड येथे एका दुकानदाराने मराठीत बोलण्यास नकार दिल्यानं त्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर आता सुशील केडिया यांची राज ठाकरे यांना आव्हान देणारी ही पोस्ट समोर आली आहे. आता मनसेकडून त्यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.