नागपूर : सध्या महाराष्ट्रात 'हिंदीची सक्ती' आणि 'मराठी अस्मिता' या मुद्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या वादाची सुरुवात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाने झाली, ज्यामध्ये इयत्ता १ ते ५ पर्यंतच्या शाळांमध्ये त्रिभाषा सूत्रांतर्गत हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीव्र आक्षेप घेतला.
त्यांनी जवळपास २० वर्षांनंतर एकत्र येत हिंदीच्या सक्तीविरोधात संयुक्त आंदोलनाची घोषणा केली. हा निर्णय मराठी अस्मितेवर घाला असल्याचा आरोप करत दोन्ही पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी ५ जुलै रोजी मुंबईत याविरोधात सभा घेतली आणि मराठीचा आवाज बुलंद केला. या सभेनंतर आता देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी देखील मराठी भाषेबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले गवई?
न्या.गवई यांनी मे महिन्यात सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली होती. मूळत: महाराष्ट्रातील रहिवासी असल्याने न्या.गवई यांचा राज्यात विविध ठिकाणी सत्कार केला जात आहे. अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर मध्ये सत्कार सोहळा आयोजित झाल्यावर न्या.गवई सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आहे. त्यांच्या मुंबई दौऱ्यापूर्वी मराठी विषयावरून राज्यात राजकारण तापले आहे. हिंदी भाषेच्या सक्तीवरून सत्तापक्ष आणि विरोधी पक्षांमध्ये शाब्दिक चकमक सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मराठी भाषेबाबत विचार व्यक्त केले. न्या.भूषण गवई यांनी सांगितले की आज मी ज्या उंचीवर पोहोचलो आहे, त्यामागे माझ्या शिक्षकांचे आणि शाळेचे फार मोठे योगदान आहे.याच शाळेतील संस्कारामुळे माझ्या आयुष्याला योग्य दिशा मिळाली. वक्तृत्वाची सुरुवातीची पावले याच व्यासपीठावर पडल्याची आठवण त्यांनी सांगितली. वक्तृत्व स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांमधून आत्मविश्वास मिळाला. त्या संधींमुळेच मी घडलो. मी स्वतः मराठी माध्यमातून शिकलेला विद्यार्थी आहे. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे विषयांची समज अधिक पक्की होते. शिक्षणासोबतच संस्कारही रुजतात, हेच संस्कार आयुष्यभर साथ देतात, असा आत्मविश्वास देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी विद्यार्थ्यांना दिला. त्यांनी गिरगाव येथील विद्यालयाला भेट देत आपल्या बालपणीच्या आठवर्णीना उजाळा दिला. प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण घेतलेल्या या विद्यालयात पुन्हा पाऊल ठेवताना सरन्यायाधीश गवई यांनी आपली जडणघडण करणाऱ्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.