Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अखेर शरद पवार यांनी भाकरी फिरवलीचं! शशिकांत शिंदे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष

अखेर शरद पवार यांनी भाकरी फिरवलीचं! शशिकांत शिंदे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष
 

माजी मंत्री तथा आमदार जयंत पाटील यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची धुरा नेमकी कोणाकडे सोपवली जाणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. दरम्यान, आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. खुद्द खासदार शरद पवार यांनीच त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. आता शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला चांगला विजय मिळवून देण्याची त्यांच्यावर जबाबदारी असणार आहे.

अनिल देशमुखांनी प्रस्ताव मांडला, नंतर…

आज मुंबईत वाय बी चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी पक्षाची सर्वसाधारण बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवार, जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, हर्षवर्धन पाटील, शशिकांत शिंदे यांच्यासह इतरही अनेक महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती होती. या बैठकीनंतर पक्षाच्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी भाषण केले. अनिल देशमुख यांनी नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी शशिकांत शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. हा प्रस्ताव एकमताने संमत करण्यात आला. त्यानंतर शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांच्या नावाची राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा केली.

शरद पवार नेमकं काय म्हणाले?
प्रदेशाध्यक्षपदासाठी शशिकांत शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवल्यानंतर सुनील भुसारा यांच्याकडून या प्रस्तावाला अनुमोदन देण्यात आले. तसेच उत्तम जानकर यांच्याकडूनही या प्रस्तावाला अनुमोदन देण्यात आले. त्यानंतर शरद पवार यांनी या प्रस्तावावर आपले मत व्यक्त केले. अनिल देशमुख यांनी जे नाव सुचवले आहे, त्या नावाला खासदार अमोल कोल्हे यांनी अनुमोदन दिल आहे. हे नाव आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. या निवडणूक प्रक्रियेत शशिकांत शिंदे यांचे एकच नाव आले आहे, असे शरद पवार म्हणाले. तसेच पुढे त्यांनी शशिकांत शिंदे यांच्या नावाची पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा केली.
जयंत पाटलांनी जबाबदारीतून मुक्त करण्याची केली होती विनंती

काही दिवसांपूर्वी जाहीर भाषणात जयंत पाटील यांनी मला प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशा भावना व्यक्त केल्या होत्या. त्यांच्या या विनंतीनंतर शरद पवार यांनीदेखील प्रदेशाध्यक्षपदासाठी लवकरच नव्या नावाचा विचार केला जाईल, असे शरद पवार म्हणाले होते. त्यानंतर शशिकांत शिंदे यांची लवकरच प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड केली जाईल, अशी चर्चा रंगली होती. आता त्यांची अधिकृतपणे शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली आहे.

शशिकांत शिंदे यांच्यापुढे नवे आव्हान
दरम्यान, राज्यात एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची चर्चा चालू आहे. असे असताना आता शशिंकात शिंदे यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आलेली आहे. त्यामुळे या निवडणुकीत पक्षाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवण्याचे आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे. यात ते किती यशस्वी ठरणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.