Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दक्षिण भारत जैन सभेचे १०३ वे त्रैवार्षिक अधिवेशन:, हारूगेरी येथे संपन्न होणार

दक्षिण भारत जैन सभेचे १०३ वे त्रैवार्षिक अधिवेशन हारूगेरी येथे संपन्न होणार
 

दक्षिण भारत जैन सभा ही गेली १२६ वर्षे जैन समाजाची प्रातिनिधिक सामाजिक संस्था म्हणून कार्य करीत आहे. संस्थेच्या माध्यमातून जैन समाजाच्या संस्कार, शिक्षण व आरोग्य, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, कृषी व औद्योगिक विकासाला चालना मिळाली आहे. अशा या रचनात्मक सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेचे त्रैवार्षिक महाधिवेशन दि. २० व २१ जुलै २०२५ रोजी हारूगेरी, ता. रायबाग, जि. बेळगावी येथील श्री आदिनाथ समुदाय भवन येथे होणार असून या संपूर्ण सोहळ्याचे अध्यक्षस्थानी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष श्री. भालचंद्र पाटील हे भूषविणार असून या त्रैवार्षिक अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष युवा नेते, सहकाररत्न श्री. उत्तम रावसाहेब पाटील हे आहेत.

कर्नाटक राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व बेळगावचे पालकमंत्री नामदार श्री. सतिश जारकीहोळी व कर्नाटक राज्याचे नियोजन व सांख्यिकी मंत्री नामदार डी. सुधाकर हे प्रमुख अतिथी त्याचबरोबर माजी खासदार डॉ. प्रभाकर कोरे, आमदार लक्ष्मण सवदी, आमदार महेंद्र तमण्णावर, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार अभय पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह खासदार कु. प्रियांका जारकीहोळी, आमदार प्रकाश हुक्केरी, आमदार राजू कागे, आमदार सौ. शशिकला जोल्ले, आमदार दुर्योधन ऐहोळे, आमदार गणेश हुक्केरी, आमदार निखिल कत्ती, आमदार लखन जारकीहोळी, आमदार चन्नराज हट्टीहोळी, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी खासदार रमेश कत्ती, माजी मंत्री श्रीमंत पाटील, माजी आमदार शाम घाटगे, पी. राजू, महंतेश कवटगीमठ, महेश कुमठोळी, संजय पाटील, विवेकराव पाटील, कल्लाप्पा मगेण्णावर, मोहन शहा, सुभाष जोशी यांच्यासह कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील विविध आर्थिक व सामाजिक संस्थांचे मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे आज सभेचे अध्यक्ष श्री. भालचंद्र पाटील व चेअरमन श्री. रावसाहेब जि. पाटील यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.
 

 

रविवार दि. २० जुलै रोजी सकाळी ९.०० ते १० या वेळेत अधिवेशन उद्घाटन व अध्यक्ष पदग्रहण सोहळा प. पू. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी संस्थान मठ नांदणी व प.पू. स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी, कोल्हापूर यांच्या पावन सान्निध्यात संपन्न होईल. डी.सी.सदलगे यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण होईल. श्रावकरत्न स्व. रावसाहेब आ. पाटील (दादा) नगरचे उ‌द्घाटन श्री. जिन्नाप्पाण्णा अस्की तर शांतिपीठ उद्घाटन इरगौडा धुळगौडा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. समारंभाचे दीपप्रज्वलन डॉ. महावीर दानिगोंड यांच्या हस्ते होईल. समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्री. भालचंद्र विरेंद्र पाटील असतील. रविवारी स. १० ते १२.०० जैन महिला परिषद, दु. १२ ते १.३० वीर महिला मंडळ मध्यवर्ती समिती, दु. २ ते ४ वीर सेवा दल मध्यवर्ती समिती आणि दु. ४ ते ६ या वेळेत पदवीधर संघटना या शाखांची अधिवेशने होतील.
सोमवार, दि. २१ जुलै रोजी स. ९.३० वा. दक्षिण भारत जैन सभेच्या विविध पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होईल. या मुख्य समारंभास कर्नाटक राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व बेळगावचे पालकमंत्री नामदार श्री. सतिश जारकीहोळी व कर्नाटक राज्याचे नियोजन व सांख्यिकी मंत्री नामदार डी. सुधाकर हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभणार आहेत. माजी खासदार डॉ. प्रभाकर कोरे यांच्याहस्ते दीपप्रज्वलन, माजी उपमुख्यमंत्री व विद्यमान आमदार लक्ष्मण सवदी व आमदार महेंद्र तमण्णावर यांच्या हस्ते स्मरणिका प्रकाशन होईल. जनता एज्युकेशन सोसायटीचे श्री. भिमगोंडा व. कर्नवाडी यांना आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते डॉ. कर्मवीर भा. पाटील शिक्षण सेवा पुरस्कार, मुंबई येथील नामवंत उद्योगपती श्री. सुरेश भूपाल बहिरशेट यांना आमदार अभय पाटील यांच्या हस्ते श्रावकरत्न रावसाहेब पाटील जीवन गौरव पुरस्कार, श्री. विजय बाबूराव कोगनोळे, क. एकंद यांना आमदार राहूल आवाडे यांच्या हस्ते पद्मभूषण क्रांतिवीर नागनाथआण्णा नायकवडी समाजसेवा पुरस्कार, तर माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते श्री महावीर मल्टिपर्पज क्रेडिट सौहार्द सह. लि. संस्थेला श्री अरिहंत क्रेडिट सौहार्द सह. आदर्श संस्था पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यांच्यासह विविध क्षेत्रातील २३ मान्यवरांना पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे. या संपूर्ण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी द.भा. जैन सभेचे अध्यक्ष श्री. भालचंद्र पाटील असतील. याचदिवशी दुपारी २.०० वा. दक्षिण भारत जैन सभेचे १०३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कामकाज संपन्न होईल.
हारूगेरी परिसरात जैन समाजाचे त्रैवार्षिक अधिवेशन प्रथमचं होत आहे. महाराष्ट्राबरोबरच कर्नाटकातील बेळगाव, हुबळी, धारवाड, जमखंडी, बागलकोट, विजापूर, निपाणी, बोरगाव आदि विभागातील जैन समाज या अधिवेशनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. तरी या अधिवेशनासाठी जैन समाजाने प्रचंड संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन दक्षिण भारत जैन सभेने केले आहे. यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, स्वागताध्यक्ष उत्तम रावसाहेब पाटील, द.भा. जैन सभेचे चेअरमन रावसाहेब जि.पाटील, व्हा. चेअरमन माधव (दत्ता) डोर्ले, मुख्यमहामंत्री डॉ. अजित पाटील, खजिनदार संजय शेटे व सहखजिनदार अरविंद दादा मजलेकर, पेट्रॉन ट्रस्टी अभिनंदन रावसाहेब पाटील आदि प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.