श्रीरामपूर : राज्य सरकारने मद्यावर लागू केलेली दरवाढ आणि १० टक्के अतिरिक्त व्हॅट रद्द करा; अन्यथा जिल्ह्यातील सर्व परमिट रूम व वाईनशॉप व्यावसायिक बार बंद ठेवून आंदोलनाच्या मार्गावर जातील, असा तीव्र इशारा श्रीरामपूर तालुका परमिट रूम व वाईनशॉप ओनर्स सोशल असोसिएशनचे अध्यक्ष नाना जोंधळे यांनी दिला आहे.
श्रीरामपूर येथे सोमवारी झालेल्या
असोसिएशनच्या बैठकीत त्यांनी सरकारच्या धोरणावर कठोर शब्दांत टीका केली. ते
म्हणाले, लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडे पैसा नाही, म्हणून त्याचा भार
परमिट रूमधारकांवर टाकला जातोय. हे अन्यायकारक असून, अतिरिक्त करांमुळे हा
व्यवसाय मोडकळीस येत आहे. राज्यातील हॉटेल, परमिट रूम आणि वाईनशॉपसाठी
एकसंध करप्रणाली असावी, अशी व्यावसायिकांची मागणी आहे.
मात्र, सरकारने फक्त परमिट रूमवर अतिरिक्त कर लावला आहे. या निर्णयामुळे कायदेशीर व्यवसाय धोक्यात आला असून, बेकायदेशीर दारूविक्रीला उत आला आहे. अनेक परवाना नसलेली हॉटेल्स, ढाबे सर्रास मद्यविक्री करत असून, अधिकृत बार व्यवसाय अडचणीत सापडला आहे. ते म्हणाले, आम्ही सरकारला वेळोवेळी सूचित केले, पण सरकारने आमचा आवाज दुर्लक्षित केला. वार्षिक उत्पादन शुल्क आणि अतिरिक्त व्हॅटमुळे ग्राहक कमी झालेत, उत्पन्न घटलंय आणि लाखो लोकांच्या रोजगारावर गदा आली आहे.१० टक्के अतिरिक्त व्हॅट तत्काळ रद्द करावा, एकसंध करप्रणाली लागू करावी, वार्षिक उत्पादन शुल्कात जनगणनेनुसार सुधारणा करावी, उत्पादनाच्या पहिल्या टप्प्यावरच कर आकारणी व्हावी या मागण्या मान्य न झाल्यास, परमिट रूम व्यावसायिक बार अनिश्चित काळासाठी बंद ठेवणार आहेत. यामुळे शासनाला कोट्यवधींच्या महसुलाचा फटका बसेल, असा इशारा दिला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.