सातारा : इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडे बांधकाम कामगारांची नोंदणी केली जाते. या नोंदीत कामगारांना वेगवेगळ्या सुमारे 32 शासकीय योजनांचा लाभ मिळतो. याच योजनांच्या लाभावर डोळा ठेवून नोंदणीच्या अटी व नियमातील पळवाटांचा आधार घेत सहायक कामगार आयुक्त कार्यालयात बोगस बांधकाम कामगारांची नोंदणी करणारे दलाल व संघटना यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यस्तरीय पथक सातार्यात आले असून, यातून पर्दाफाश होणार असल्याने दलालांचे धाबे दणाणले आहेत.
बांधकाम कामगारांची नोंदणी ही कामगाराने स्वतः दिलेल्या हमीपत्राच्या आधारे केली जाते. याचाच गैरफायदा घेत काही दलाल व कथित कामगार संघटना या मोठ्या प्रमाणावर बोगस बांधकाम कामगारांची नोंदणी करत आहेत. अशा प्रकारच्या तक्रारी वाढल्याने कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी जिल्हानिहाय दक्षता पथक स्थापन करून तपासणीचे आदेश सहायक कामगार आयुक्त यांना दिले आहेत. त्यावर सहायक कामगार आयुक्त नितीन कवले यांनी अशा दलाल व संघटनांवर कारवाईचा फास आवळला आहे. असे असतानाच राज्यातील 4 जणांचे पथक सातार्यात दाखल झाले आहे. सातारा शहर व जिल्ह्यातील काही ठेकेदार व संघटनांची या पथकाने तपासणी केली आहेच. यातील बहुतांश ठेकेदारांनी मोठ्या संख्येने कामगार आपल्याकडे कामाला असल्याचे शिक्के कामगारांना दिले आहेत.
आता या कामगारांचे वेतनपत्रक, हजेरीपट इत्यादी सर्व रेकॉर्ड सादर करावे, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. त्यामुळे बोगस कामगार नोंदीत केलेले दलाल व संघटना यांचे धाबे दणाणले आहेत. प्रत्येक विभागात, प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा कार्यालय प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली एक स्वतंत्र जिल्हास्तरीय दक्षता पथक गठित करण्यात आले आहे. या पथकांचे कार्यक्षेत्र मात्र त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्याऐवजी दुसर्या जिल्ह्यात आहे. जेणेकरून कारवाई अधिक निष्पक्ष आणि प्रभावी राहील. दक्षता पथकांना नेमून दिलेल्या जिल्ह्यांमध्ये बनावट कागदपत्रांद्वारे होणारी नोंदणी, नोंदणीसाठी पैसे मागण्याचे प्रकार आणि खोटे दाखले सादर करून मिळवले जाणारे लाभ या बाबींवर लक्ष केंद्रित करुन तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. काही ठेकेदार व संघटना कोणत्याच प्रकारचे रेकॉर्ड सादर करु न शकल्याने आता या कामगारांची नोंदणी रद्द करुन ठेकेदारांवर शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल होणार आहे.
दरमहा एक तपासणी बंधनकारक
या तपासणी दरम्यान ज्यांच्या काही तक्रारी असतील त्यांना आपल्या तक्रारी दक्षता पथकाकडे देता येतील, असे जाहीर करण्यात आले आहे. दक्षता पथकाने प्रत्येक महिन्याला एक तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच या निर्णयामुळे बांधकाम कामगारांची फसवणूक करणार्या दलालांवर आळा बसणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.