कोल्हापूर :- शाळेचा क्लर्क न्यायालयात कंबरेला रिव्हॉल्व्हर लावून आला, तिसऱ्या मजल्यावर जिल्हा न्यायाधिशांसमोर गेला अन्...
कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयात कंबरेला रिव्हॉल्व्हर लावून गेलेल्या फिर्यादी लिपिकावर गुन्हा दाखल झाला. सुरेश संभाजी नरके (वय ४२, रा. वठार तर्फ वडगाव, ता.हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आली. त्याचा शस्त्रपरवाना रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे तातडीने प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.
पोलिसांनी सांगितले की, सुरेश नरके हा एका शाळेत लिपिक म्हणून काम करतो. आज सकाळी तो मोकातील एका खटल्यात फिर्यादी म्हणून तिसऱ्या मजल्यावरील जिल्हा न्यायालयात हजर होण्यासाठी आला होता. जिल्हा न्यायाधीश तांबे न्यायालयात डायसवर हजर असताना पावणेबाराच्या सुमारास आल्यानंतर त्याच्या कंबरेला रिव्हॉल्व्हर होते.याची माहिती मिळताच तेथे हजर असलेल्या पोलिसांनी न्यायालयात अग्निशस्त्र, जिवंत राउंड, ज्वालाग्राही पदार्थ घेऊन येण्यास बंदी असतानाही रिव्हॉल्व्हरसह न्यायालयात आल्याच्या कारणावरून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील रिव्हॉल्व्हर जप्त केली. त्याच्याकडे अधिक माहिती घेतली असता तो पेठवडगाव येथील मोकाच्या आरोपातील फिर्यादी असल्याची माहिती पुढे आली. सकाळी तो घरातून निघून न्यायालयात दाखल झाला. त्याच्याकडे असलेली रिव्हॉल्व्हर मोटारसायकलवर कोठे ठेवणार म्हणून त्याने ती कंबरेला ठेवून न्यायालयात प्रवेश केला. पोलिस कॉन्स्टेबल संजय पारळे यांनी त्याच्याविरोधात फिर्याद दिली.
पोलिसांनी नरकेकडील सुमारे दीड लाख रुपयांची काळसर रंगाची व चॉकलेटी रंगाची क्लिप असलेली रिव्हॉल्व्हर जप्त केली. न्यायालयात शस्त्र घेऊन प्रवेश करणे गुन्हा आहे याची माहिती असतानाही त्याने ती न्यायालयात जवळ बाळगली म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. रात्री उशिरापर्यंत तो शाहूपुरी पोलिस ठाण्यात होता. त्याच्याकडे चौकशी सुरू होती.
रिव्हॉल्व्हरचा परवाना मिळाला कसा ?
लिपिकाला रिव्हॉल्व्हरचा परवाना कसा मिळाला, नरकेचा अन्य कोणता व्यवसाय आहे काय ? यासह अन्य तपास होणार आहे. मात्र तातडीने त्याचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्वच परवानाधारकांची माहिती संकलित करून त्यांना शस्त्राची गरज आहे की नाही हे पाहणे यानिमित्ताने गरजेचे झाले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.