महाराष्ट्र हादरला! धावत्या बसमध्येच प्रसूती, नंतर बाळाला बाहेर फेकलं; कथित पती-पत्नीचा अमानुष प्रकार
पाथरी (जि. परभणी): पाथरी ते सेलू रस्त्यावरील देवनांदरा शिवारात आज (मंगळवार) सकाळी ६ वाजता एका खासगी ट्रॅव्हल बसमधून नवजात बाळ बाहेर फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच पाथरी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि अर्भक ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित बसचा सेलू ते परभणी दरम्यान पाठलाग करत जुन्या जिल्हा परिषद समोर बस अडवली. त्यानंतर प्रवाशांची कसून चौकशी करून पोलिसांनी एका महिलेस आणि पुरुषाला ताब्यात घेतले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ही 'संत प्रयाग' खासगी ट्रॅव्हल बस पुण्याहून परभणीकडे येत होती. देवनांदरा शिवारात आल्यानंतर एका प्रवाशाने नवजात बाळ बाहेर फेकले. ही घटना एका नागरिकाच्या लक्षात आली आणि त्याने तातडीने पाथरी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तपास केला असता, तो नवजात पुरुष बालक असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर बसचा माग काढत पोलिसांनी परभणीमध्ये बस थांबवून दोघांना ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ. लोखंडे, थोरे, वाघ, कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली.
ट्रॅव्हल बसमध्येच झाली होती प्रसूती!
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, महिलेची प्रसूती ट्रॅव्हल बसमध्येच झाली होती. त्यामुळे घाबरून नवजात अर्भक बाहेर फेकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. संबंधित महिला व पुरुष हे एकमेकांचे पती-पत्नी असल्याचे सांगत आहेत. दरम्यान, दोघांनाही पाथरी पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून पुढील कारवाई सुरू असल्याची महिती पोलीस निरीक्षक लांडगे यांनी दिली. सध्या अधिक तपास सुरू असून, घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे काम पोलीस करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.