Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मोदी निवृत्त झाल्यास त्यांच्याजागी कोण? सर्व्हेमध्ये या 'टॉप थ्री' नेत्यांचा बोलबाला, पण एक नेता देऊ शकतो धक्का...

मोदी निवृत्त झाल्यास त्यांच्याजागी कोण? सर्व्हेमध्ये या 'टॉप थ्री' नेत्यांचा बोलबाला, पण एक नेता देऊ शकतो धक्का...
 
 
सरसंघचालक मोहन भागवत यांच्या एका विधानामुळे देशातील राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यांनी ७५ वर्षांनंतर नेत्यांनी निवृत्त व्हायला हवे, असे सूचविणारे विधान त्यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबर महिन्यांत ७५ वर्षांचे होणार आहेत. त्यावरून आता चर्चांना उधाण आले आहेत. पण पंतप्रधान मोदी खरंच निवृत्त झाल्यास त्यांच्याजागी पंतप्रधानपदी कोण असेल, असा प्रश्न उपस्थित होतो.

नरेंद्र मोदी हे २०१४ पासून पंतप्रधान आहेत. त्यांची ही तिसरी टर्म आहे. पण ही टर्म पूर्ण होण्याआधीच ते ७५ वर्षांचे होत आहेत. यापूर्वी भाजपने ७५ ओलांडलेल्या नेत्यांना निवृत्त केले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी निवृत्त होणार का, झाल्यास दुसरे कोण, असा प्रश्न यापूर्वीही अनेकदा चर्चेत आला आहे. इंडिया टुडेने एका सर्व्हेमध्ये याची उत्तरे मिळतात.

सर्व्हेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सर्वाधिक पसंतीचे नेते ठरले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि तिसऱ्या क्रमांकावर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आहेत. शहांना सर्वाधिक २५ टक्के लोकांचा पाठिंबा आहे. त्याखालोखाल योगींना १९ टक्के तर गडकरींना १३ टक्के लोकांची पसंती मिळाली आहे.
 

 

'टॉप थ्री'वरील या तीन नेत्यांपाठोपाठ केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनाही लोकांनी पसंती दिली आहे. मात्र, या दोघांना अंत्यत कमी म्हणजे पाच टक्केंच्या जवळपास लोकांची पसंती दिसते. इंडिया टुडेच्या ऑगस्ट २०२४ च्या सर्व्हेमध्येही अमित शहा यांच्या नावावर दक्षिण भारतातील ३१ टक्के लोकांनी मते नोंदवली होती. देशाच्या अन्य भागापेक्षा मिळालेली ही सर्वाधिक पसंती आहे. देशातील सरासरी २५ टक्के एवढी आहे.

विशेष म्हणजे, आधीच्या सर्व्हेपेक्षा अमित शाह आणि योगींची लोकप्रियता कमी झाल्याचेही इंडिया टुडेने म्हटले आहे. ऑगस्ट २०२३ आणि फेब्रुवारी २०२४ च्या सर्व्हेमध्ये अनुक्रमे शहांना २८ व २९ टक्के लोकांची पसंती होती. ती आता २५ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. योगींच्या बाबतीतही तेच घडले आहे. त्यांच्या बाजूने असलेली मते २५ टक्क्यांवरून १९ टक्क्यांपर्यंत खाली आली आहेत. नितीन गडकरी हे मात्र आपली लोकप्रियता टिकवून असल्याचे दिसते.

दरम्यान, सर्व्हेमध्ये कुणाचेही नाव पुढे-मागे असली तरी पंतप्रधानपदासाठी संबंधित नेत्याच्या नावाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पसंतीही आवश्यक असणार आहे. त्यामध्ये साहजिकच आणखी एका नावाची चर्चा होते, ते म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. फडणवीस हे आरएसएसच्या मुशीत वाढलेले नेते आहेत. सुसंस्कृत, अभ्यासू, उच्चशिक्षित नेते म्हणून महाराष्ट्रासह देशात त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्रातील भाजपमध्ये सध्या त्यांच्याशिवाय पानही हलत नाही. ते दिल्लीत जाण्याबाबत सातत्याने चर्चाही झडत असतात. त्यामुळे त्यांचे नाव पुढे आल्यास आश्चर्य वाटायला नको.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.