Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्र हदरला :, धक्कादायक! मुलीची टीसी मागायला गेलेल्या वडिलांचा संस्थाचालकाच्या मारहाणीत मृत्यू

महाराष्ट्र हदरला :, धक्कादायक! मुलीची टीसी मागायला गेलेल्या वडिलांचा संस्थाचालकाच्या मारहाणीत मृत्यू
 

परभणी : निवासी शाळेतून मुलीचा शाळेचा दाखला काढून आणण्यासाठी गेलेल्या पालकाला संस्थाचालक व त्यांच्या पत्नीने उर्वरित पैसे न भरल्याचा राग मनात धरून मारहाण केली. त्यानंतर बेशुद्ध पडलेल्या पालकाला परभणीच्या दवाखान्यात नेले असता, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. हा प्रकार पूर्णा तालुक्यातील झिरो फाटा येथील हायटेक निवासी शाळेत गुरुवारी घडला. या प्रकरणी पूर्णा पोलिस ठाण्यात मयताच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून संस्थाचालक आणि त्याच्या पत्नीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद झाला.

जगन्नाथ पांडुरंग हेंडगे (४२, रा.उखळद, ता.परभणी) असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी मुंजाजी रामराव हेंडगे यांनी पूर्णा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. जगन्नाथ हेंडगे यांनी त्यांची मुलगी पल्लवी हिचा प्रवेश तिसरीच्या वर्गामध्ये बाळकृष्ण सेवाभावी संस्था वाडी, तुळजापूर संचलित हायटेक रेसिडेन्शियल स्कूल झिरो फाटा येथे जून महिन्यात घेतला होता. 
 
मुलगी पल्लवी ही निवासी शाळेत एक आठवडा राहून सहा जुलै रोजी उखळद येथे परत आली. त्यानंतर शाळेत जायचे नाही, मला तेथे राहायचे नाही, असे म्हणून ती घरीच थांबली. यानंतर १० जुलै रोजी इतरत्र प्रवेश घेण्यासाठी तिचा या शाळेतील दाखला काढून आणण्यासाठी जगन्नाथ हेंडगे आणि नातेवाईक गुरुवारी सायंकाळी पाच वाजता हायटेक रेसिडेन्शिअल स्कूलवर गेले होते. त्यावेळी जगन्नाथ हेंडगे हे शाळेच्या मुख्य कार्यालयात गेले तर सोबतचे नातेवाईक मुख्य प्रवेशद्वारावर थांबले होते.


यानंतर १५ ते २० मिनिटांनी आरडाओरड करत घाबरलेल्या अवस्थेत जगन्नाथ हेंडगे तेथून बाहेर पडले. यावेळी नातेवाईकांनी काय झाले असे विचारले असता त्यांनी संस्थाचालक प्रभाकर चव्हाण व त्यांच्या पत्नीने लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचे सांगितले व उर्वरित रक्कम द्या, असे म्हणून पुन्हा मारहाण केली. घटनेनंतर नमूद दोघे हे तेथून निघून जा नाहीतर तुमच्यावर केस करतो, असे म्हणून कारमध्ये बसून निघून गेले. जगन्नाथ हेंडगे यांना जबर मार लागल्याने ते जागीच बेशुद्ध झाले. त्यांना परिसरातील काही नागरिक व नातेवाईकांनी परभणीत एका दवाखान्यात आणले असता तेथील डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.

घटनेने सर्वत्र हळहळ
याप्रकरणी मुंजाजी हेंडगे यांच्या फिर्यादीवरून प्रभाकर चव्हाण व त्यांची पत्नी अशा दोघांविरुद्ध पूर्णा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. त्यानुसार कलम १०३ (१) ११५ (२), ३५२, ३ (५) बीएनएस प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक विलास गोबाडे करीत आहेत. घटनास्थळी पूर्णाचे उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील यांच्यासह पोलीस निरीक्षक गोबाडे यांनी भेट दिली. शुक्रवारी नमूद शाळेच्या परिसरात पोलीस यंत्रणेने बंदोबस्त तैनात केला होता. मयताचा मृतदेह गुरुवारी रात्री जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता. मयत जगन्नाथ यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.