बीड :- मृत घोषित केलेलं बाळ रात्रभर दुर्लक्षित; दुसऱ्या दिवशी बॅगमध्ये टाकून नेलं, कुदळ सापडेना म्हणून झाला उशीर अन्...
बीडच्या अंबाजोगाई येथे असलेल्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात धक्कादायक प्रकार घडला होता. जन्म घेतलेल्या बाळाला मृत घोषित केल्यानंतर ते बाळ जिवंत निघालं. नेमकं अंत्यसंस्कारावेळी बाळ रडल्याने सगळ्यांनाच धक्का बसला. या प्रकरणी आता अंतर्गत चौकशी समिती
नेमण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिष्ठाता धपाटे यांनी दिली. केज
तालुक्यातील एक गरोदर माता 'स्वाराती'च्या प्रसूती व स्त्रीरोग विभागात
सोमवारी (ता. सात) दाखल झाली. या महिलेची प्रसूती होऊन तिने जन्म दिलेले
बाळ ९०० ग्रॅम वजनाचे होते. परंतु, या बाळाचे पल्स सुरू नसल्याने ते जग
सोडून गेल्याचे सांगत रुग्णालयाकडून नातेवाइकांकडे सोपविण्यात आले. हे बाळ
नातेवाईक घेऊन जात असताना रस्त्यातच त्याची हालचाल सुरू झाली, तेव्हा
त्याचे पालक परत त्यास रुग्णालयात घेऊन आले.
बाळाचे आजोबांनी सांगितलं की, सोमवारी
तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान सुनेला डिलिव्हरीसाठी रुग्णालयात दाखल
केलं. संध्याकाळी सात ते आठच्या दरम्यान डिल्हिवरी झाली. त्यानंतर अर्धा ते
पाऊण तासाने मला फोन आला. मला सांगितलं की, जन्मलेलं बाळ मृत आहे. रात्री
उशीर झाला होता म्हणून मी सकाळी ६ वाजता जाण्याचं ठरवलं. ''सकाळी सहा वाजता
अंबाजोगाईला दवाखान्यात पोहोचलो. मृत घोषित केलेलं बाळ एका बॅगमध्ये टाकून
बॅग मोटारसायकलला अडकवून होळला (ता. केज, जि. बीड) घेऊन आलो. त्याला दफन
करायचं होतं. त्यासाठी खड्डा खोदायचा होता. त्याची तयारी करण्यासाठी खोरं,
फावडं, कुदळ शोधत होतो.''
कुदळ सापडेना...
बाळाचे आजोबा पुढे म्हणाले की, कुदळ सापडत नव्हती.. तेवढ्यात माझ्या पत्नीने, एकवेळ बाळाचा चेहरा बघू द्या.. असं म्हटलं. तिने बांधलेलं सोडलं आणि त्या बाळाने जांभळी दिली, लगेच ते रडूही लागलं. तिने मला सांगितलं, हे तर जिवंत आहे त्याला कशाला पुरायचं. मग आम्ही एक खासगी जीप बोलावून बाळाला अंबाजोगाईच्या रुग्णालयात नेलं.''रुग्णालयात गेल्यानंतर कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. मी म्हटलं हे वाचू किंवा मरु.. परंतु जिवंत असताना मृत कसं म्हटलं? मीही दुःखात होतो. माझ्या पत्नीने बाळाला बघितलं म्हणून जमलं नाहीतर मी जिवंत बाळाला पुरलं असतं. कुदळ सापडली नाही, ती शोधण्यासाठी वेळ लागला. तेवढ्या वेळेत पत्नीने बाळ बघितलं.. म्हणून पुढचा अनर्थ टळला. कुदळ जर वेळेत सापडली असती तर अनर्थ घडला असता.'' असं बाळाचे आजोबा सांगतात.आता हे बाळ एनआयसीयूमध्ये असून उपचार सुरु आहेत. उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी प्रकृती चांगली असल्याचं म्हटलं आहे. डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्याचा मला खेद वाटतोय. यापुढे तरी अशा पद्धतीने जिवंत बाळ मृत असल्याचं सांगण्यात येऊ नये, एवढीच अपेक्षा असल्याचं बाळाच्या आजोबांनी सांगितलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.