Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भुईजमध्ये सराफाला लुटणाऱ्या टोळीतील दरोडेखोर जेरबंद; सांगली एलसीबीची कारवाई

भुईजमध्ये सराफाला लुटणाऱ्या टोळीतील दरोडेखोर जेरबंद; सांगली एलसीबीची कारवाई
 

सांगली : भुईज (जि. सातारा) जवळ सराफ व साथीदारास अडवून मारहाण करून २० लाखांची रोकड लुटल्याचा प्रकार पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडला. दरोड्यानंतर आठ ते दहाजणांची टोळी सांगलीकडे पळाली. त्यांचा थरारक पाठलाग सुरू असताना योगेवाडी (ता. तासगाव) जवळ मोटारीचा अपघात झाला. दरोडेखोर मोटार सोडून पळाले. यापैकी विनीत राधाकृष्णन (३०, रा. पलाकाड, राज्य केरळ) याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली.





पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हिवरे (ता. खानापूर) येथील सराफ विशाल पोपट हसबे हे साथीदारासमवेत शनिवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास रोकड घेऊन निघाले होते. भुईजजवळ त्यांना अडवून आठ ते दहाजणांच्या टोळीने त्यांना मारहाण करून मोटारीतील २० लाखांची रोकड ताब्यात घेतली. त्यानंतर धमकावून टोळी सांगलीच्या दिशेने पळाली. हसबे यांनी तत्काळ सातारा पोलिसांना हा प्रकार कळवला. तेथील नियंत्रण कक्षातून सांगलीच्या नियंत्रण कक्षाला हा प्रकार कळवला. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी तत्काळ स्थानिक गुन्हे अन्वेषण व सर्व पोलिस ठाण्यांना कळवून पळालेल्या दरोडेखोरांचा शोध घेण्यास सांगितले.
दरम्यान, दरोडेखोर सांगलीकडे पळाल्यानंतर फिर्यादी हसबे यांचे मित्र व पोलिस पथक दरोडेखोरांच्या मागावर होते. त्यांचा पाठलाग सुरू असताना योगेवाडीजवळ दरोडेखोरांच्या मोटारीचा अपघात झाल्याची माहिती गुन्हे अन्वेषणच्या पथकातील कर्मचारी उदय साळुंखे व सागर टिंगरे यांना मिळाली. त्यामुळे गुन्हे अन्वेषणचे पथक योगेवाडीत दाखल झाले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने शोध सुरू केला. तेव्हा विनीत राधाकृष्णन हा परिसरात लपलेला आढळला. त्यामुळे त्याला ताब्यात घेतले. चौकशी केल्यानंतर त्याने इतर साथीदार डोंगरातून पळून गेल्याचे सांगितले. तसेच दरोड्याची कबुली दिली. विनीत याला तत्काळ भुईज पोलिसांच्या ताब्यात दिले. गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, कर्मचारी उदय साळुंखे, सागर टिंगरे, सुशील मस्के, दरिबा बंडगर, सतीश माने, सुनील जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

रेकॉर्डवरील गुन्हेगार
विनीत राधाकृष्णन हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध हायवेवर दरोडा टाकण्याचे गुन्हे दाखल आहेत. सांगली पोलिसांनी त्याला अवघ्या तीन तासात पकडले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.