Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मद्यधुंद मनसे जिल्हाध्यक्षाचा रुग्णालयात राडा; ICU मध्ये घुसला, मध्यरात्री डॉक्टरला बेदम मारहाण

मद्यधुंद मनसे जिल्हाध्यक्षाचा रुग्णालयात राडा; ICU मध्ये घुसला, मध्यरात्री डॉक्टरला बेदम मारहाण
 

बुलढाणा : राज्यात सध्या मराठीच्या मुद्द्यावरुन मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच, गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर या घटनेचे अनेक व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसैनिक व पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या भूमिकेबाबत सोशल मीडियावर व्यक्त न होण्याचे निर्देश दिल्यानंतर हे व्हिडिओ काही प्रमाणात कमी झाले आहेत. मात्र, आता बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील मनसे जिल्हाध्यक्षाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, मध्यरात्री मद्यधुंद अवस्थेत हे महाशय रुग्णालयात जाण्यासाठी वाद घालत असल्याचं पाहायला मिळत आहे. नातेवाईकांना भेटण्यासाठी अतिदक्षता विभागात जाऊ द्या, असे म्हणत ते रुग्णालयातील डॉक्टरला  मारहाण देखील केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बुलढाणा जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण जाधव याने आपल्या मित्रांसह मध्यरात्री 3 वाजता मेहकर येथील गाभणे हॉस्पिटल या खासगी रुग्णालयातील जूनियर डॉक्टरला बेदम मारहाण केली. मनसेचा जिल्हाध्यक्ष लक्ष्मण जाधव हा मद्यधुंद अवस्थेत रात्री अडीच वाजता गाभणे हॉस्पिटल येथील अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या त्याच्या नातेवाईकाला भेटण्यासाठी गेला. मात्र, तेथील डॉक्टरने मध्यरात्री रुग्णाला भेटण्याची वेळ नसते, रुग्णांना आरामाची गरज असते. त्यामुळे तुम्ही एक-एक व्यक्ती जाऊन भेटून येऊ शकता असे सांगितले. 
 
त्यावर, आम्हाला सर्वांना एकाचवेळी आयसीयूमध्ये जाऊ दे असं म्हणत आयसीयूमधील कार्यरत ज्युनिअर डॉक्टरला लक्ष्मण जाधव यांनी जबर मारहाण केली. दरम्यान, ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून याप्रकरणी मेहकर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या मनसे जिल्हाध्यक्षांवर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, या घटनेनं जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच, तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रातील अनेकांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे. दरम्यान, रुग्णालयात राडा केल्याप्रकरणी आणि ज्युनिअर डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी बुलढाणा महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या जिल्हाध्यक्ष लक्ष्मण जाधव यांच्यावर मेहकर पोलिसात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लक्ष्मण जाधव यांच्यासह इतर 7 आरोपींवर गुन्हे दाखल झाले असून मनसे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण जाधव व इतर आरोपी फरार आहेत. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
 

 




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.