येत्या १५ ऑगस्ट रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने मांस विक्री आणि कत्तलखान्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल आहे. या निर्णयावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. या निर्णयावर शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी टीका केली केली आहे. आता यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. स्वातंत्र्यदिनीच लोकांच्या खाण्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे. हा नक्की कोणता स्वातंत्र्यदिन आहे, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
कोणी काय खावं हे सरकारने सांगू नये
राज ठाकरे यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कल्याण डोंबिवलीतील मासंविक्री बद्दल विचारण्यात आले. त्यावर त्यांनी स्पष्टपणे भाष्य केले. “कल्याण डोंबिवलीतील मनसैनिकांना ते चालू ठेवा हे मी सांगितलं आहे. कोणी काय खावं आणि काय खाऊ नये याचा निर्णय महापालिका आणि सरकारने करु नये. एकाबाजूने आपण स्वातंत्र्य दिन साजरा करायचा पण खायचे स्वातंत्र्य नाही. स्वातंत्र्य दिनी जर तुम्ही कोणती बंदी आणत असाल तर हाच यात विरोधाभास आहे. स्वातंत्र्य म्हटल्यावर तुम्ही बंदी का आणताय, कोणाचे काय धर्म आहेत आणि सण आहेत, याप्रमाणे कोणी काय खावं हे सरकारने सांगू नये. कोणत्याच सरकारने सांगू नये. स्वातंत्र्य दिनी आपण लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेत आहोत. हा कोणता स्वातंत्र्य दिन आहे”, असे राज ठाकरे म्हणाले.या बंदीविरोधात डोंबिवलीतील खाटीक समाजाने निदर्शने करत बंदी उठवण्याची मागणी केली आहे. मात्र, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आपला निर्णय कायम असल्याचे स्पष्ट केले आहे. राज्य सरकारने स्थानिक पातळीवर असे निर्णय घेण्याचे अधिकार पालिकांना दिले असून, हा निर्णय नवीन नसून जुनाच असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे, आता या निर्णयामुळे राजकीय आणि सामाजिक स्तरावर वाद वाढतच असल्याचे दिसत आहे.
शासन आदेशात नेमकं काय?
कल्याण
डोंबिवली पालिकेने १५ ऑगस्ट, स्वातंत्र्यदिनी शहरातील लहान मोठ्या
प्राण्यांचे कत्तलखाने बंद ठेवणे. तसेच या दिवशी शहरातील मटण, मांस
विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. यावेळी एक जुना संदर्भही
देण्यात आला. नगरविकास विभाग-१० च्या २२ एप्रिल १९८७ च्या आदेशाप्रमाणे
वैद्यकीय आरोग्यधिकाऱ्यांच्या निवेदनाप्रमाणे कल्याण डोंबिवली पालिकेचे
तत्कालीन प्रशासक शिवलिंग भोसले यांनी डिसेंबर १९८८ मध्ये गांधी जयंती,
महावीर जयंती, सवंत्सरी, १५ ऑगस्ट, गणेश चतुर्थी, साधु वासवानी जन्म दिवस
(२५ नोव्हेंबर) यादिवशी कल्याण, डोंबिवलीतील कत्तलखाने बंद करण्याचा निर्णय
घेतला, असेही त्यात नमूद करण्यात आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.