आज जर तुमच्याकडे 1 कोटी रुपये असतील, तर तुम्ही करोडपती आहात. तुम्ही म्हणाल की या पैशात मुलीचं लग्न थाटामाटात करता येईल, मुलांना परदेशात शिकवता येईल किंवा एखादं मोठं घर घेता येईल. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की 25 वर्षांनंतर म्हणजेच 2050 मध्ये या 1 कोटी रुपयांची किंमत किती असेल? उत्तर ऐकल्यावर तुम्हाला धक्का बसेल.
महागाई: पैशाची हळूहळू होत जाणारी घसरण
महागाई म्हणजे वस्तू आणि सेवांच्या किमती वाढत जाणं आणि पैशाची खरेदीशक्ती कमी होत जाणं. गेल्या 20-25 वर्षांत भारतात किरकोळ महागाई सरासरी 6% पेक्षा जास्त राहिली आहे. अलीकडच्या वर्षांत ती थोडी कमी झाली असली तरी, येत्या 25 वर्षांत सरासरी 5% महागाई राहील असं गृहीत धरलं, तर चित्र धक्कादायक आहे. 5% सरासरी महागाई दराने आजचे 1 कोटी
रुपये 2050 मध्ये केवळ 29.53 लाख असतील. म्हणजेच आज 1 कोटीत जे काही
मिळतंय, तेच 25 वर्षांनंतर जवळपास 3.4 कोटी रुपये खर्च करून घ्यावं लागेल.
उदाहरणातून समजून घ्या
जर तुम्ही आज मुलीचं लग्न 1 कोटी रुपयांत करत असाल, तर 2050 मध्ये तसंच लग्न करण्यासाठी तब्बल 3.4 कोटी रुपये लागतील. परदेशात शिक्षण, घर खरेदी किंवा इतर खर्च - हे सगळं तीनपट वाढणार आहे. हीच आहे महागाईची ताकद जी हळूहळू पैशांची किंमत कमी करत राहते. आज 1 कोटी रुपये पुरेसे आहेत असं वाटतं, पण भविष्यातील गरजा त्यापेक्षा कितीतरी जास्त असणार आहेत. त्यामुळे योग्य फायनान्शियल प्लॅनिंग आणि महागाईपेक्षा वेगाने वाढणाऱ्या गुंतवणुकीचं नियोजन करणं अत्यावश्यक आहे.
महागाईवर मात करणाऱ्या 5 सुरक्षित योजना
(ऑगस्ट 2025 चे दर)
पब्लिक प्रॉविडंट फंड - व्याजदर 7.10% p.a. (करमुक्त, 15 वर्षांचा लॉक-इन)
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट - व्याजदर 7.7% p.a. (5 वर्षांचा लॉक-इन, 80C करसवलत)
किसान विकास पत्र - व्याजदर 7.5% p.a. (सुमारे 9.5 वर्षांत पैसा दुप्पट)
सिनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम (SCSS) - व्याजदर 8.2% p.a. (करसवलत, निवृत्ती धारकांसाठी उत्तम)
फिक्स्ड डिपॉझिट (FDs) - 6.6%-7% (मोठ्या बँका), 8%-8.25% (काही लहान बँका)
जोखीम घेणाऱ्यांसाठी
म्युच्युअल फंड्स आणि शेअर बाजार हे दीर्घकालीन दृष्टीने महागाईपेक्षा जास्त परतावा देऊ शकतात. मात्र त्यात जोखीम आहे. यात कधी परतावा भरघोस, तर कधी तोटा होतो. स्थिरतेसाठी सरकारी योजना आणि बँक ठेवी चांगल्या; पण जोखीम घेण्याची क्षमता असेल, तर इक्विटी म्युच्युअल फंड किंवा SIP दीर्घकालीन दृष्टीने जास्त फायदेशीर आहे.Q1. 2050 मध्ये आजच्या 1 कोटी रुपयांची किंमत किती राहील?- अंदाजे 29.53 लाख रुपये.Q2. भविष्यात त्याच खर्चासाठी किती पैसे लागतील?- आजचा 1 कोटी खर्च भागवायला सुमारे 3.4 कोटी रुपये लागतील.Q3. हे का घडते?- महागाईमुळे पैशाची खरेदी क्षमता सतत कमी होत जाते.Q4. महागाईवर मात करण्यासाठी कोणते पर्याय आहेत?- पीपीएफ, एनएससी, केव्हीपी, एससीएसएस आणि एफडीसारख्या सरकारी/बँक योजना.Q5. जास्त परतावा हवा असल्यास काय करावे?- इक्विटी म्युच्युअल फंड्स किंवा SIP निवडता येतील, मात्र रिस्क जास्त आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.