वाहतूक कोंडी ही राज्यातील सर्वच शहरांमधील मोठी समस्या आहे. मुंबई तसंच उपनगरात हा प्रश्न नेहमीच गंभीर असतो. घोडबंदर रोड तर वाहतूक कोंडीसाठी बदनाम आहे. ठाणे घोडबंदर महामार्गावरील खड्ड्यांमुळे झालेल्या वाहतूक कोंडीत ॲम्ब्युलन्स अडकल्यामुळे एका 49 वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला आहे. छाया कौशिक पुरव असं या महिलेचं नाव आहे. त्या पालघर तालुक्यातल्या सफाळे, मधुकर नगर येथे राहत होत्या.
नेमकं काय झालं?
छाया यांच्या अंगावर 31 जुलै रोजी झाडाची फांदी पडल्यानं त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. या अपघातामध्ये त्यांच्या बरगड्या, खांदे आणि डोक्याला मार लागला होता. पालघरमध्ये ट्रॉमा सेंटर नसल्याने, स्थानिक रुग्णालयाने त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात रेफर केले. साधारणतः 100 किलोमीटरचे हे अंतर पार करायला 2.5 तास लागतात. त्यानुसार, पुरव यांना भूल देण्यात आली. दुपारी 3 वाजता त्यांना घेऊन ॲम्ब्युलन्स निघाली. छाया यांचे पती कौशिक पुरव हे त्यांच्या सोबत होते. पण, त्यांची ॲम्ब्युलन्स मुंबई अहमदाबाद मार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीमध्ये अडकली.जवळपास 6 वाजता, प्रवास सुरू करून तीन तासांपेक्षा जास्त वेळ झाला होता, तरी ॲम्ब्युलन्स अर्धेच अंतर पार करू शकली होती. भूलचा प्रभाव कमी झाल्याने छाया पुरव यांना असह्य वेदना होऊ लागल्या. त्यांची प्रकृती बिघडल्याने, त्यांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी रुग्णवाहिका हिंदुजा रुग्णालयापासून सुमारे 30 किमी अंतरावर असलेल्या मीरा रोडवरील ऑर्बिट रुग्णालयात रात्री 7 वाजता पोहोचली. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी पुराव यांची तपासणी केली आणि त्यांना मृत घोषित केले.
चार तास असह्य वेदना...
'छाया यांना 30 मिनिटे आधी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असते तरी त्यांचा जीव वाचू शकला असता,' असं डॉक्टरांनी कौशिक यांना सांगितलं. "मी तिला चार तास असह्य वेदनांमध्ये पाहिलं," अशी हतबल भावना कौशिक यांनी व्यक्त केली. धक्का बसलेल्या कौशिक यांनी सांगितले की, त्यांनी छाया पुरव यांना वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण वाहतूक कोंडीमुळे त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. "रस्त्यावर खूप खड्डे होते आणि त्यामुळे तिला खूप वेदना होत होत्या. त्या वेदनेने ओरडत होत्या आणि रडत होत्या. त्यांनी मला लवकरात लवकर रुग्णालयात घेऊन जाण्याची विनंती केली. पण आम्ही अडकलो होतो, अनेक वाहने चुकीच्या दिशेने येत असल्यामुळे वाहतूक कोंडी आणखी वाढली होती," असे ते म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.