उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुती सरकारमध्ये नाराज असल्याचं बोललं जात आहे. निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढवली गेली. त्यात विजयही मिळाला. पण मुख्यमंत्र्यांची माळ शिंदें ऐवजी देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडली. तेव्हापासून शिंदे हे नाराज असल्याचं बोललं जात आहे. शिवाय निधी वाटपावरून ही शिंदेंच्या मंत्र्यांची नाराजी लपून राहीलेली नाही. त्यामुळे शिंदे जरी महायुतीत असले तरी समाधानी नाहीत अशी राजकीय वर्तूळात चर्चा आहे. त्यात आता शिंदेंना थेट भाजपच्या एका बड्या नेत्याने आणि विद्यमान मंत्र्यांने डिवचले आहे.
एकनाथ शिंदे लॉटरी लागल्याने मुख्यमंत्री झाले. असा टोला या भाजप मंत्र्याने लगावला आहे. परंतु कमावलेले टिकवता आलं पाहिजे असा सल्लाही द्यायला हा नेता विसरला नाही. या भाजप मंत्र्याचं नाव गणेश नाईक आहे. एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातून विस्तव ही जात नाही. नाईक म्हणतात, प्रत्येकाला लॉटरी लागत नाही. परंतु एकनाथ शिंदे यांना लॉटरी लागली. ते मुख्यमंत्री झाले याचा आनंद आहे. पण कमावलेले टिकवता आले पाहिजे. किती कमावलं,कसं कमवलं पण कसं टिकवलं हेच जनसामान्यांच्या ध्यानात राहतं" हे सांगायला ते विसरले नाहीत.पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांना आरसाच दाखवण्याचं एक प्रकारे काम केलं आहे. त्यामुळे गणेश नाईक यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आज मनोर जाळील दुर्वेस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमिपूजन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात गणेश नाईक बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे. विशेष म्हणजे यावेळी पालघर आणि बोईसर विधानसभेचे शिवसेनेचे दोन्ही आमदार तसेच खासदार डॉ हेमंत सवरा उपस्थित होते. गणेश नाईक हे शिंदे यांच्यावर टीका करण्याची संधी सोडत नाही.नाईक यांनी आता केलेले वक्तव्य हे शिवसेना शिंदे गटाच्या मनाला लागणार आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेकडून आता कशा पद्धतीने प्रत्युत्तर दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात गणेश नाईक हे त्यांना थेट आव्हान देताना दिसत आहेत. म्हणूनच त्यांच्यावर पालघरचीही जबाबदारी दिली गेली आहे. आपण ठाण्यात ही जनता दरबार घेणार असं सांगत त्यांनी शिंदेंना ललकारलंही होतं. नवी मुंबईत गणेश नाईक यांची ताकद आहे. सध्या तिथे शिवसेना वाढवण्याचं काम शिंदे करत आहे. हे नाईक यांच्या नाराजीचं मुळ कारण मानलं जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.