राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांना शासकीय दौऱ्यासाठी वाहन नाकारले; चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाचा प्रताप
चंद्रपूर : इंधन उपलब्ध नसल्याचे कारण देत राज्य अतिथीचा दर्जा असलेले राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांना जिल्हाधिकारी कार्यालयाने शासकीय दौऱ्यासाठी वाहन उपलब्ध करून दिले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा एकप्रकारे राज्य अतिथींचा अपमान आहे. शासकीय दौऱ्यास वाहन उपलब्ध करून न देणाऱ्या जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या या अपमानजनक वर्तनाची नोंद घेवून चौकशी करावी, अशी मागणी अहीर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागीय आयुक्त, नागपूर यांना चौकशीचे आदेओश दिले.
राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष अहीर यांनी मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार केली. भारत सरकारच्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष या नात्याने राज्य अतिथी म्हणून शासकीय दौऱ्यासाठी शासकीय वाहन उपलब्ध करून देण्यात येते. असे असतानाही चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून इंधन उपलब्ध नसल्याचे कारण दर्शवून वाहन नाकारण्यात आले. हा प्रकार राज्य अतिथी म्हणून अवमानजनक आहे. ४ एप्रिल २०२५ रोजी नवी दिल्ली येथून आल्यानंतर ४ ते ७ एप्रिल, असे चार दिवस शासकीय वाहन उपलब्ध न झाल्यामुळे यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी यांना माझ्या कार्यालयाचेवतीने विचारणा करण्यात आली.तेव्हा निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडून शासनाकडून यापूर्वीच्या दौऱ्यातील इंधनाचा निधी प्राप्त न झाल्याने तसेच पेट्रोल पंपाद्वारे इंधन मिळत नसल्याने शासकीय वाहन पाठवू शकत नाही, असे उत्तर देण्यात आले. याच कारणास्तव सलग १५ दिवस शासकीय वाहन नाकारण्यात आले. दरम्यान, तुम्ही स्वत: इंधन भरल्यास वाहन देवू, असे सचिवांना सांगण्यात आले. तसेच स्वखर्चाने शासकीय दौऱ्यासाठी इंधन भरण्यास भाग पाडण्यात आले. हा प्रकार इथेच थांबला नाही, तर महिन्यातून तीन दिवसांसाठीच वाहन देवू, असे सांगण्यात आले. विशेष म्हणजे त्यानंतर पूर्णत: वाहन देणे बंद करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी यांंच्याकडून हा सर्व प्रकार झालेला आहे. यामुळे जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या या अपमानजनक वर्तनाची नोंद घेवून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी अहीर यांनी पत्राद्वारे केली.
मुख्यमंत्र्यांकडून विभागीय आयुक्तांना चौकशीचे आदेश
अहीर
यांच्या तक्रारीची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली. याप्रकरणी त्यांनी
विभागीय आयुक्त, नागपूर यांच्याकडे चौकशीची जबाबदारी सोपवली. राज्य
अतिथींसंदर्भात घडलेला हा प्रकार अत्यंत गंभीर असून चौकशी करून तत्काळ
अहवाल सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. अहीर यांनी
अधिकाऱ्यांकडून मिळालेली अपमानजनक वागणूक बघता जिल्हाधिकारी व निवासी
उपजिल्हाधिकारी यांची तत्काळ बदली करावी, अशीही मागणी केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.