कुत्र्याच्या तोंडात मानवी हात, शरीराचे अवयव कापून भरले पिशवीत;
डॉक्टर जावयानेच केली सासूची निर्घृण हत्या, मुलीला देहविक्रीस प्रवृत्त
केलं अन्...
बंगळूर (कर्नाटक) : तुमकुरु जिल्ह्यातील कोराटगेरे तालुक्यात कोलाला गावाजवळ काही दिवसांपूर्वी प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये एका महिलेचे कापलेले अवयव सापडल्याने खळबळ माजली होती. पोलिस तपासानंतर या भीषण हत्येचा उलगडा झाला असून, आरोपी स्वतः पीडितेचा जावई निघाला. डॉ. रामचंद्रप्पा नावाच्या दंतचिकित्सकाने आपल्या सासूची निर्घृणपणे हत्या करून तिचे 19 तुकडे केले आणि वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. या प्रकरणात रामचंद्रप्पासह त्याचा सासरा आणि दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे.
घटना कशी उघडकीस आली?
काही दिवसांपूर्वी पोलिसांना एका नागरिकाकडून फोन आला. एका कुत्र्याच्या तोंडात मानवी हात दिसला. पोलिस लगेच घटनास्थळी पोहोचले आणि परिसरात शोध घेतला असता 5 किलोमीटरच्या आत विविध ठिकाणी एका महिलेचे 19 अवयव सापडले. मात्र, शीर गायब होते. शवावरील दागिने, तसेच असल्याने लूटमारीचा हेतू नसल्याचे स्पष्ट झाले. फॉरेन्सिक तपासातून मृतदेह महिलेचा असल्याचे निश्चित झाले. पोलिसांनी बेपत्ता महिलांची यादी तयार केली आणि चौकशी सुरू केली.
पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार
तपासात समजले, की मृत महिला 47 वर्षीय बी. लक्ष्मीदेवी उर्फ लक्ष्मीदेवम्मा असून ती बेल्लावे गावची रहिवासी होती. तिचा पती बसवराज सुतार यांनी काही दिवसांपूर्वी पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार केली होती. 3 ऑगस्ट रोजी लक्ष्मीदेवी आपली लेक तेजस्वीच्या हनुमंतपुरा येथील घरी गेली होती आणि तेथून बाहेर पडताना शेवटची दिसली होती. काही दिवसांनी कोराटगेरेतील एका निर्जन ठिकाणी महिलेचे शीर सापडले, ज्याची ओळख पतीने पटवली. पोलिसांच्या लक्षात आले, की हत्या अत्यंत नियोजनबद्ध आणि परिचित व्यक्तीनेच केली आहे.
कारवर बोगस नंबर प्लेट
तपासासाठी अनेक पथके तयार करण्यात आली. 3 ऑगस्टच्या दुपारी हनुमंतपुराहून कोराटगेरेकडे जाणारी पांढरी एसयूव्ही कार सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसली. कारवर बोगस नंबर प्लेट होती. तपासातून कार उर्दीगेरे गावातील शेतकरी सतीशच्या नावावर नोंदणीकृत असल्याचे समोर आले. सतीशचे कॉल रेकॉर्ड तपासल्यानंतर 3 ऑगस्ट रोजी त्याचा फोन बंद असल्याचे पोलिसांना आढळले. त्याला आणि त्याचा साथीदार किरणला होरानाडू मंदिरातून अटक करण्यात आली. चौकशीत कळाले, की कार प्रत्यक्षात डॉक्टर रामचंद्रप्पाची होती, पण नोंदणी सतीशच्या नावावर होती. रामचंद्रप्पा हा पीडितेचा जावई असल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्याची पत्नी तेजस्वी ही लक्ष्मीदेवीची मुलगी असून ती रामचंद्रप्पापेक्षा 20 वर्षांनी लहान आहे.
हत्या का केली?
रामचंद्रप्पाला संशय होता, की त्याची सासू त्यांच्या वैवाहिक आयुष्यात लुडबूड करते आणि स्वतःच्या मुलीला देहविक्रीस प्रवृत्त करत आहे. या कारणास्तव त्याने सहा महिन्यांपूर्वी हत्येचा प्लॅन आखला. पकड टाळण्यासाठी त्याने एसयूव्ही कार सतीशच्या नावावर घेतली आणि सतीश व किरणला प्रत्येकी 4 लाख रुपयांचे आमिष दाखवले (त्यातील 50,000 रुपये आगाऊ दिले).
धारदार हत्याराने मृतदेहाचे केले 19 तुकडे
3 ऑगस्ट रोजी लक्ष्मीदेवी लेकीच्या घरातून निघाली, तेव्हा रामचंद्रप्पाने तिला बेल्लावे येथे सोडण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवले. कारमध्ये आधीच सतीश व किरण लपून बसले होते. लक्ष्मीदेवी बसताच तिचा गळा आवळून खून करण्यात आला. मृतदेह सतीशच्या शेतात नेऊन ठेवण्यात आला. दुसऱ्या दिवशी डॉक्टर रामचंद्रप्पाने धारदार हत्याराने मृतदेहाचे 19 तुकडे केले. शीर, हात, पाय इत्यादी वेगळे करून ते वेगवेगळ्या निर्जन ठिकाणी फेकले, जेणेकरून ओळख पटू नये. मात्र, पोलिसांच्या तपासामुळे अखेर सर्व आरोपींना अटक करण्यात आली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.