"पाटलांनी सांगितलं म्हणून शांत... संयम तुटला तर मंत्र्याच्या घरात घुसून आरक्षण घेऊ" : मराठा बांधवांचा इशारा
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु केलेल्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. जरांगे पाटील यांनी तिसऱ्या दिवशीही आपला निर्धार कायम ठेवला असून मराठा अन् कुणबी एकच असल्याचा शासनादेश काढा त्याशिवाय माघार घेणार नाही असा पवित्रा घेतला आहे. जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा बांधवांचे जत्थे मुंबईत धडकत असून हजारो मराठा बांधव तीन दिवसांपासून तळ ठोकून आहेत.
मराठा आंदोलकांच्या जेवणाची व पाणी पिण्याची सोय करण्यासाठी राज्यभरातून रसद पोचू लागली आहे. मात्र, पहिले दोन दिवस मराठा बांधवांचे काहीसे हाल झाले. ना अंथरूण, ना पांघरूण..प्लॅटफॉर्मवर, जागा मिळेल तिथे मराठा बांधव झोपले. आज आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी काही आंदोलक थेट मुंबईच्या समुद्रात उतरले. नरीमन पॉईंटवर समुद्रात उतरत मराठा बांधवांनी एकच गर्दी केली.यावेळी मराठा बांधव आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. नरीमन पॉईंट जवळून विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांची गाडी जात असताना आंदोलकांनी गाडी अडवली. मात्र पोलिसांनी गाडी सोडली. त्यानंतर मराठा बांधव थेट समुद्रात उतरले. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या एकदम रास्त असून त्या जर मान्य नाही केल्या तर उद्या तुम्हाला मुंबई जाम झालेली दिसेल. आज आम्ही समुद्रात उतरलं उद्या मुंबईत उतरलो तर पूर्ण मुंबई ब्लॉक करु असा इशारा मराठा आंदोलकांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना दिल्या.
आम्हाला मनोज जरांगे पाटील यांनी शांत बसायला सांगितलं आहे, म्हणून आम्ही शांत आहोत. मात्र आमचा संयम जर तुटला तर मुंबई आमच्यासाठी काहीच नाही. आम्ही मंत्रालयात सुद्धा घुसायला कमी करणार नाही. ज्यादिवशी पाटलांचा आदेश येईल त्यादिवशी एक-एक मराठा एक-एक मंत्र्याच्या घरात घुसून आरक्षण घेऊ म्हणजे घेऊ असा इशारा आंदोलकांनी दिला.
यावेळी मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही साद घातली. म्हणाले, फडणवीस साहेब आम्ही हिंदू आहोत. हा मराठा समाज हिंदूच आहे. हिंदूच्या नावाने तुम्ही जेवढे मतं घेतात त्याच्यातला पन्नास ते साठ टक्के हिंदू आज रस्त्यावर आहे. हिंदूद्या नावावर तुम्हाला फक्त मतं चालतात का? आमच्या मागण्या नाही का कळत तुम्हाला? नार्वेकर साहेब हा समाज तुमची वाट बघत होता पण तुम्ही काचा वर करुन निघून गेले अशी टीका मराठा आंदोलकांनी यावेळी केली.
काय आहेत जरांगे यांच्या मागण्या?
हैदराबाद, सातारा संस्थानाचे गॅझेटिअर लागू करावे, मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जावे, आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांना दहा लाखांची आर्थिक मदत द्यावी,मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबातील सदस्याला सरकारी नोकरी द्या, मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावेत अशा मागण्या जरांगे पाटील यांनी सरकारपुढे ठेवल्या आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.