मुंबईत घर नाही सांगून बंगला न सोडणाऱ्या मुंडेंचा चौपाटीवर आलिशान फ्लॅट, खरेदी केल्यापासून बंदच, कोट्यवधी रुपये किंमत
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे हे मंत्रिपद गेल्यानतंरही अजून सरकारी निवासस्थान असलेल्या सातपुडा बंगल्यात राहतायत. पाच महिन्यानंतरही त्यांना बंगला रिकामा न केल्यानं मंत्री भुजबळ सध्या वेटिंगवर आहेत. प्रकृती बरी नसल्यानं उपचारासाठी मुंबईत
राहणं आवश्यक असल्याने बंगला सोडला नसल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं
होतं. मात्र गतवर्षी विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करताना
गिरगाव चौपाटीवर असलेल्या आलिशान फ्लॅटचा उल्लेख केला होता. मुंबईथ ४
बीएचके फ्लॅट असूनही धनंजय मुंडे हे सरकारी निवासस्थान सोडण्यास तयार नाहीत
यावरून आता चर्चा रंगल्या आहेत.
गिरगाव चौपाटीवर एन.एस पाटकर मार्गावर वीरभवन नावाची २२ मजली इमारत आहे. या इमारतीत नवव्या मजल्यावर धनंजय मुंडे यांचा आलिशान फ्लॅट आहे. विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या प्रतिज्ञापत्रातच याची माहिती त्यांनी दिली होती. डिसेंबर २०२३ मध्ये धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे यांच्या नावे १६ कोटी ५० लाखांना हा फ्लॅट खरेदी केला गेलाय. यात १० कोटी रुपये धनंजय मुंडे यांनी खर्च केले आहेत.धनंजय मुंडे यांच्या नावे असणाऱ्या गिरगाव चौपाटीवरील या घरात सध्या कुणीही राहत नाही. खरेदी केल्यापासून हे घर बंदच असून नुतनीकरणाचे काम सुरू असल्याचं सांगण्यात येतंय. जवळपास २१५० चौरस फुटांचा हा ४ बीएचके फ्लॅट आहे. धनंजय मुंडे यांनी सरकारी बंगला मंत्रिपद गेल्यानंतरही तब्बल ५ महिने वापरला. यामुळे त्यांना आतापर्यंत ४२ लाखांपेक्षा जास्त दंडही झाला आहे. ही दंडाची रक्कम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माफ करू शकतात. पण मंत्रिपद गेल्यानंतरही इतका काळ धनंजय मुंडे यांनी बंगला सोडलेला नाही. त्यांनी दंडाचीही रक्कम अद्याप भरलेली नाही अशी माहिती समजते. मुंबईत इतर कुठेही घर नाहीय आणि सध्या उपचार सुरू असल्यानं मुंबईत राहणं आवश्यक आहे. त्यामुळे सरकारी निवासस्थान सोडलं नाही असा दावा धनंजय मुंडे यांनी केला होता. दुसरीकडे मुंबईत गिरगाव चौपाटीवर फ्लॅट असणाऱ्या धनंजय मुंडे यांनी यावर मात्र मौन बाळगलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.