Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

DRDO चा व्यवस्थापकच निघाला ISI चा एजंट, क्षेपणास्त्रांची गोपनीय माहिती दिली पाकिस्तानला

DRDO चा व्यवस्थापकच निघाला ISI चा एजंट, क्षेपणास्त्रांची गोपनीय माहिती दिली पाकिस्तानला
 

जयपूर : पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी (ISI) हेरगिरी केल्याच्या गंभीर आरोपाखाली राजस्थान पोलिसांच्या गुप्तचर विभागाने मंगळवारी एका व्यक्तीला अटक केली. महेंद्र सिंह असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) गेस्ट हाऊसचा व्यवस्थापक आहे.

जैसलमेरमधील चांदन फील्ड फायरिंग रेंजजवळ असलेल्या या गेस्ट हाऊसमधून तो देशाच्या सुरक्षेशी संबंधित अत्यंत संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवत होता. गुप्तचर विभागाला मिळालेल्या माहितीनुसार, एका आठवड्यापूर्वी महेंद्र सिंह याला हेरगिरीच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर जयपूरमध्ये पोलीस आणि विविध सुरक्षा यंत्रणांनी त्याची संयुक्त चौकशी केली. या चौकशीदरम्यान त्याच्या विरोधात सबळ पुरावे सापडल्याने त्याच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर त्याच्यावर ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट, १९२३ अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला रीतसर अटक करण्यात आली. 
 
या कारवाईबाबत माहिती देताना आयजी विष्णूकांत यांनी सांगितले की, "आरोपी महेंद्र सिंह हा मूळचा उत्तराखंडमधील अल्मोरा येथील रहिवासी आहे. तो आपल्या पाकिस्तानी हँडलरला नियमितपणे संवेदनशील माहिती पुरवत होता. चौकशीत असे उघड झाले आहे की, तो डीआरडीओचे शास्त्रज्ञ आणि भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या चांदन फील्ड फायरिंग रेंजवरील भेटींची खडान्‌खडा माहिती पाकिस्तानला देत होता." "याशिवाय, त्याने क्षेपणास्त्र आणि इतर शस्त्रास्त्रांच्या चाचण्यांविषयीची अत्यंत गोपनीय माहितीही शत्रूराष्ट्राला दिली," असेही विष्णूकांत यांनी स्पष्ट केले. महेंद्र सिंह गेल्या चार ते पाच वर्षांपासून या गेस्ट हाऊसचे व्यवस्थापन पाहत होता. या काळात त्याने सामरिक लष्करी मोहिमांशी संबंधित महत्त्वपूर्ण डेटाही पाकिस्तानला पुरवल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.