बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेत्री आणि समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन त्यांच्या तापट स्वभावामुळे नेहमी चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये त्या रागाच्या भरात एका व्यक्तीला धक्का देताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये जया बच्चन एका व्यक्तीसोबत उभ्या राहून काहीतरी बोलत असतात. तितक्यात दुसरा व्यक्ती बाजूला येऊन त्यांच्यासोबत सेल्फी क्लिक करण्याचा प्रयत्न करतो. हे पाहून त्या खूपच भडकतात आणि त्याला धक्का देऊन ओरडतात. जया बच्चन अशा पद्धतीने वागण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांना अशाच अंदाजात अनेकदा पाहिलं गेलंय. परंतु आताचा त्यांचा व्हिडीओ पाहून नेटकरी खूपच चिडले आहेत. या व्हिडीओवर आता भाजपच्या खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौत यांनीसुद्धा संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
कंगना यांनी त्यांच्या इन्स्टा स्टोरीवर जया बच्चन यांचा व्हायरल व्हिडीओ शेअर करत लिहिलं, 'सर्वाधिक बिघडलेली आणि हक्क गाजवणारी महिला. लोक यांचे नखरे आणि बकवास यासाठी झेलतात कारण या अमिताभ बच्चन यांच्या पत्नी आहेत. ही समाजवादी पार्टीची टोपी त्यांच्या डोक्यावर कोंबडीच्या तुऱ्यासारखी दिसतेय. त्या स्वत: कोंबडीसारख्या दिसत आहेत. लज्जास्पद गोष्ट आहे ही.' कंगना यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.जून महिन्यात दिग्दर्शक रोनो मुखर्जी यांच्या प्रार्थनासभेतही जया बच्चन पापाराझींवर चिडताना दिसल्या होत्या. प्रार्थनासभेनंतर जेव्हा त्या कारमध्ये बसायला जातात तेव्हा त्या पापाराझींना म्हणतात, "चला तुम्हीपण सोबत चला..या." इतकंच नव्हे तर "बकवास सगळं, घाणेरडे सर्वजण घाणेरडे" अशा शब्दांत त्यांनी राग व्यक्त केला होता. त्यांचा हा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.जया बच्चन यांच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'या नेहमी कोणा ना कोणावर भडकत असतात. अमिताभजी यांना कसं सहन करतात', असा सवाल एकाने केला. तर 'ऐश्वर्या रायवर रोज राग व्यक्त करत असेल', असंही दुसऱ्याने म्हटलंय. सार्वजनिक ठिकाणी सेल्फी किंवा फोटो क्लिक करणाऱ्यांना पाहून जया बच्चन यांचा अनेकदा राग अनावर होतो. परंतु याच स्वभावामुळे त्या सध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.