Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

साहेबांना पैसे दिल्याशिवाय सही करत नाहीत! जातपडताळणीसाठी महिलेने घेतली 18 हजारांची लाच

साहेबांना पैसे दिल्याशिवाय सही करत नाहीत! जातपडताळणीसाठी महिलेने घेतली 18 हजारांची लाच
 
 
नगर: जात पडताळणी ऑफिसमधील साहेबांना पैसे दिल्याशिवाय ते प्रमाणपत्रावर सही करत नाहीत, असे म्हणून कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी 18 हजारांची लाच स्वीकारताना एका खासगी महिलेला लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले. दरम्यान, संबंधित महिलेने ही लाच कोणासाठी घेतली होती, याचा तपास सुरू आहे. याबाबतची माहिती अशी की, तक्रारदाराच्या मुलीला पुढील शिक्षणाकरिता कुणबी जातीचे पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक होते. त्यासाठी दि. 16 जून 2025 रोजी येथील जिल्हा जातपडताळणी समितीकडे अर्ज व पूरक कागदपत्रे जमा केली होती. परंतु ते प्रमाणपत्र अद्याप मिळाले नाही. तक्रारदारास एका सायबर कॅफेच्या संचालकांनी उषा मंगेश भिंगारदिवे यांच्याशी संपर्क करून दिला.

भिंगारदिवे यांनी, ‌'तुमच्या मुलीचे जात पडताळणी प्रमाणपत्र मी मिळवून देते; परंतु त्यासाठी मला 20 हजार रुपये द्यावे लागतील. ऑफिसमधील साहेबांना पैसे दिल्याशिवाय ते प्रमाणपत्रावर सही करत नाहीत,‌' असे म्हणत लाचेची मागणी केली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. तक्रारीची पडताळणी दि .18 सप्टेंबर 2025 रोजी झाली. संबंधित महिलेने तक्रारदाराकडे जात पडताळणी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी व स्वतःसाठी 18000 रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविली. तसेच 18 हजार रुपये स्वीकारताना तिला रंगेहात पकडण्यात आले. संबंधित महिलेवर तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत विभागाचे उपाधिक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक छाया देवरे यांनी ही कारवाई केली. कारवाईत पोलिस कॉन्स्टेबल सचिन सुद्रुक, गजानन गायकवाड, वैभव सुपेकर आदींनी सहभाग नोंदवला.

महिलेचा मोबाईल तपासात महत्त्वाचा
दरम्यान, आरोपी महिलेचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला आहे. त्या महिलेने लाच कार्यालयातील कोणासाठी स्वीकारली, तिचा संपर्क कोणासोबत होता, यापूर्वी अशाप्रकारे किती जात प्रमाणपत्रे देण्यात आली याबाबतचा तपास सुरू आहे.

- छाया देवरे, पोलिस निरीक्षक, लाचलुचपत विभागया लाच प्रकरणातील आरोपींमध्ये अधिकाऱ्यांचा किंवा कर्मचाऱ्यांचा सध्या तरी समावेश केलेला नाही. तपास सुरू आहे. त्यात नेमके काय निष्पन्न होईल, ते आताच सांगता येणार नाही.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.