शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या एका फोटोवरून भाजप ) नेत्या चित्रा वाघ यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. दोन वर्षांपूर्वी अभिनेत्री उर्फी जावेदच्या कपड्यांवरून गदारोळ करणाऱ्या चित्रा वाघ आता अमृता फडणवीसांच्या वेशभूषेवर का बोलत नाहीत, असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला आहे.
सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, 'अमृता फडणवीस यांनी आपल्या वेशभूषेबद्दल दाखवलेला बेदरकारपणा हा इथल्या सनातनी संस्कृतीला लगावलेली जबरदस्त चपराक आहे.' त्यांनी पुढे म्हटले की, जे तथाकथित संस्कृती रक्षक उर्फी जावेदच्या वेळी आकांडतांडव करत होते, ते आता अमृता फडणवीसांच्या बाबतीत पूर्णपणे शांत आणि हतबल झाले आहेत.अंधारे यांनी दोन वर्षांपूर्वीच्या उर्फी जावेद प्रकरणाची आठवण करून दिली. 'जर उर्फी जावेदच्या वेशभूषेवरच तुमचे आक्षेप असतील, तर तसेच आक्षेप तुम्ही कंगना राणावत, केतकी चितळे किंवा अमृता फडणवीस यांच्या वेशभूषेवर घेऊ शकाल का? किंवा त्यांना मारहाणीची भाषा कराल का?' असा थेट प्रश्न त्यांनी चित्रा वाघ यांना विचारला आहे.आपल्या भूमिकेबद्दल बोलताना अंधारे म्हणाल्या की, त्या स्वतः साडी नेसतात कारण त्यांना ते सोयीचे वाटते, पण इतरांनी काय घालावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. टेनिस खेळणारी महिला साडी नेसून खेळू शकत नाही, असे उदाहरणही त्यांनी दिले. 'नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचार आणि भाषेत जास्त असतो,' असा टोला लगावत, प्रसिद्धीसाठी जनतेच्या मूळ प्रश्नांपासून भरकटू नका, असेही त्यांनी सुनावले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.