Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षाची माळ ज्येष्ठ माजी नगरसेवकाच्या गळ्यात पडणार, विश्वजित कदम यांचे संकेत, विशाल पाटील यांनी कदमांनी दिला कानमंत्र

काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षाची माळ ज्येष्ठ माजी नगरसेवकाच्या गळ्यात पडणार, विश्वजित कदम यांचे संकेत, विशाल पाटील यांनी कदमांनी दिला कानमंत्र


स्थानिकच्या तोंडावर भाजपने काँग्रेसला मोठं खिंडार पाडले असून दोन कट्टर काँग्रेसच्या नेत्यांना फोडलं आहे. दोन महिन्यातच जयश्री पाटील आणि जिल्हाध्यक्ष असणाऱ्या पृथ्वीराज पाटलांचा पक्ष प्रवेश करून घेतला आहे. यानंतर आता जिल्हा काँग्रेसअंतर्गत संघटना बदलाचे वारे वाहू लागले असून यामुळे रिक्त झालेल्या जिल्हाध्यक्ष पदासाठी आता रस्सीखेच सुरू झाली आहे. तब्बल सहा जणांनी शड्डू ठोकला असून काँग्रेस नेतृत्वापुढे नवे आव्हान उभे झाले आहे. यादरम्यान आगामी स्थानिकच्या आधीच काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पदाची धूरा ज्येष्ठ माजी नगरसेवकाच्या हातात दिली जाईल असे संकेत दिले आहेत. यामुळे आता नवा जिल्हाध्यक्ष कोण असणार? याची उत्सुकता अनेकांना लागली आहे.

भाजपने सांगली जिल्ह्यात आपला पक्ष मजबूत करण्यासाठी काँग्रेसला लक्ष केले आहे. दोन महिन्यात महापालिकेत सर्वात मोठा गट असणाऱ्या मदन पाटील गटाच्या प्रमुख जयश्री पाटील यांना फोडले. त्या पाठोपाठ त्यांचे कट्टर विरोधक असणाऱ्या जिल्हाध्य पृथ्वीराज पाटील यांनाही पक्षात घेऊन आगामी स्थानिकच्या महाविकास आघाडीच्या समोर कडवे आव्हान निर्माण केले आहे. 
 
दरम्यान रिक्त झालेल्या जिल्हाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. तब्बल सहा जणांनी जिल्हाध्यक्ष पदावर दावा सांगितला आहे. यामुळे काँग्रेस नेते विश्वजीत कदम आणि अपक्ष खासदार विशाल पाटील यांच्यासमोर नवा पेच निर्माण झाला आहे. याचदरम्यान आता विश्वजीत कदम यांनी काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ माजी नगरसेवकाची निवड केली जाईल, असे संकेत दिले आहेत. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच निवड प्रक्रिया राबवली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसमधील प्रमुख पदाधिकारी, माजी नगरसेवकांशी आज (ता.3) विश्वजित कदम यांच्याशी संवाद साधला होता त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

यावेळी कदम म्हणाले, ''काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदासाठी अनेक लोक इच्छुक आहेत. हरकत नाही, इच्छा प्रत्येकाने व्यक्त केली पाहिजे. परंतु, आपण त्या पदाला न्याय देऊ शकतो का? आपली तेवढी क्षमता आहे का? आपला तिन्ही शहरांचा तेवढा अभ्यास आहे का? महापालिका क्षेत्राबद्दल जाण किती आहे? महापालिकेतील निधी वाटपासह जे काही महत्त्वाचे विषय असतात ते रेटायला, त्या प्रकरणी भांडायला आणि त्यातील विषय लोकांसमोर मांडायला आपणास जमणार आहे का? हे अधिक महत्त्वाचे आहे. ज्याला हे सारे जमेल, अशा व्यक्तीला प्राधान्य दिले जाईल. ज्येष्ठता पाहिली जाईल. कारण, ही वेळ काम दाखवण्याची आहे. काँग्रेस पुन्हा तळागाळात नेण्याची आहे.

यावेळी खासदार विशाल पाटील यांनी इच्छुकांनी एक कामगिरी सोपवली. ते म्हणाले, ''मनपाच्या प्रभाग रचना जाहीर झाल्या आहेत, त्यावरील हरकतींबाबत काम सुरू करा. ज्याला शहराध्यक्ष व्हायचे आहे, त्याने काँग्रेस कमिटीत अधिकाधिक वेळ द्यावा. तो वेळ अधिक देईल, त्याचा दावा मजबूत होईल.'' दरम्यान, या पदासाठी इच्छुक अय्याज नायकवडी, राजेश नाईक, संजय मेंढे, मंगेश चव्हाण, मयूर पाटील आदींनी यावेळी आपली मते मांडली. कुणालाही संधी द्या, मात्र निवड प्रक्रिया लवकर राबवून काम सुरू झाले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.